रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत गृहकलह उफाळून आला. तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे यांनी रविवारी (दि. ६) शिवसेनेत प्रवेश केला. तटकरे यांचे बंधू अनिल यांचे संदीप हे पूत्र आहेत.
दादर येथील शिवसेनाभवनात संदीप तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगावले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. संदीप तटकरेंचा शिवसेना प्रवेश कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
संदीप तटकरेंच्या प्रवेशावेळी ‘घडाळ्याचा काटा अडकला, भगवा झेंडा फडकला’च्या घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.
मी नगराध्यक्ष पदासाठी तिकीटाची मागणी केली. पण नगराध्यक्ष पद कोणाला द्यावे हा प्रदेशाध्यक्षांचा अधिकार आहे, असे संदीप तटकरेंनी सांगितले. शिवसेना प्रवेश हा वैयक्तिक निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीमध्ये आपल्याकडे कोणतंही पद नव्हते त्यामुळे हे माझे राजकारणातले पदार्पण आहे, असे म्हटले.
केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांनी ‘ये तो बस झांकी है, आगे बहोत कुछ बाकी है’ असं म्हटले आहे. तसेच आता युती झालेली आहे, तशीच पुढेही सर्व ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले आहे. शेकापचे काही नेते येत्या एक-दोन दिवसात सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संदीप तटकरे अपक्ष उमेदवार आहेत, पण त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही गितेंनी सांगितले. नगराध्यक्ष निवडून येतानाच सर्व १७ नगरसेवक देखील निवडून आणायचे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी सुनील तटकरे यांनी व्याही संतोष पोटफोडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादी गृहकलहाची ठिणगी पडली. नगर परिषदेच्या निमित्ताने काका- पुतणे असा वाद रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीपासून अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यात वाद निर्माण झाले होते. श्रीवर्धनमध्ये निवडून आल्यानंतर रोह्य़ाचे नगराध्यक्षपद सोडण्यास तयार नव्हते. तेव्हा अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून हटवण्याची तयारी केली होती. त्यामुळे अवधूत तटकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून दोघांमधील संबंध ताणले गेले होते. नगर पारिषद निवडणुकीनिमित्ताने तटकरे याच्या घरातील वाद चव्हाटय़ावर आला आहे.