जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही मुख्यालय ते मुंबईपर्यंत विमानप्रवासाची परवानगी गृहविभागाने दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अर्थ व अन्य विभागांनी मान्यता दिल्याने यात आता कोणतीही अडचण नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयएएस अधिकाऱ्याला बैठक किंवा अन्य शासकीय कामासाठी मुंबईला ये-जा करण्यासाठी विमानप्रवासाची परवानगी आहे. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकासारख्या आयपीएस अधिकाऱ्याला मात्र ती नव्हती. त्यामुळे पोलीस महासंचालकांकडून याचा गेले काही महिने पाठपुरावा केला जात होता. हा प्रस्ताव मंजूर होण्यात काही अडथळे होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेत काही अधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने हा प्रस्ताव मार्गी लागला आहे.