मुंबई : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार ‘इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनी’कडून पाच हजार इलेक्ट्रीक बस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई-बसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही. प्रदीप आदी उपस्थित होते. बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे सूचित करीत परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात यावा.
कंपनीने आतापर्यंत २२० बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे. भाडेतत्त्वावर कंपनीने ५१५० इलेक्ट्रीक बस पुरवठा करण्याचा करार आहे. त्यापैकी २२० बसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये १२ मीटर व नऊ मीटर लांबीच्या बस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार ६० कोटी रुपये देण्यात आले आहे. उर्वरित ४० कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.