राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडीसारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी धार्मिक गोष्टींवर होत असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली. आपल्या धार्मिक गोष्टी उंबऱ्याच्या आत राहिल्या पाहिजे हे सांगतानाच सुप्रिया सुळेंनी आपल्याला हनुमान चालिसा म्हणता येत नाही, असंही कबुल केलं. सुप्रिया सुळे लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला खासदार म्हणून माझ्या मतदारसंघात पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडी अशा विषयांवर कोणी प्रश्न विचारत नाही आणि महत्त्वाचे नसलेले विषय चर्चेत आणले जातात. आपल्या धार्मिक गोष्टी उंबऱ्याच्या आत राहिल्या पाहिजे.”

“मला हनुमान चालिसा म्हणता येत नाही हे प्रांजळपणे कबुल करते, मात्र…”

“मला हनुमान चालिसा म्हणता येत नाही हे मी प्रांजळपणे कबुल करते. मात्र, ज्यांना हनुमान चालिसा म्हणायची त्यांचा मी आदर करते. त्यांनी जरूर म्हणावं. मात्र, इतरांच्या घराबाहेर जाऊन हनुमान चालिसा म्हणणं योग्य नाही,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“माझे वडील अजिबात मंदिरात जात नाही हे खरं नाही”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “माझे वडील अजिबात मंदिरात जात नाही हे खरं नाही, फक्त ते गाजावाजा करत नाही. माझे आई-वडील दोघे धार्मिक कर्मकांडात नसतात. त्यांना श्रद्धा ठेवायची होती, पण अंधश्रद्धेशी देखील लढायचं होतं.”

“शरद पवार यांची पीढी कर्मयोगी होती”

“शरद पवार १९७२ पासून सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात अनेकदा गेले आणि विकास कामांना मदत केली. मात्र, त्यांनी त्याचा बाऊ केला नाही. ती पीढी कर्मयोगी होती. त्यांनी शाळा, महाविद्यालयं, विमानतळ, रस्ते अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

हेही वाचा : Video : “माझा बाप माझ्यासाठी….”, सुप्रिया सुळेंनी शरद पवारांसोबतच्या नात्याविषयी व्यक्त केल्या भावना!

“धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी कधीच करणार नाही”

“चार मतं कमी पडली तरी चालेल, पण माझं माझ्या राज्यावर, देशावर प्रेम आहे, तर मी धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी कधीच करणार नाही. सगळंच मतांच्या राजकारणासाठी करू नये. आर्थिक विषय फक्त अर्थमंत्र्यांचा नाही. सर्वांचीच जबाबदारी आहे,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule comment on hanuman chalisa religious politics in maharashtra pbs
First published on: 26-04-2022 at 18:44 IST