राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या जाहिरनाम्यात एसटी विलीनीकरणाचं आश्वासन दिलं. मात्र, मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची ही मागणी मान्य का झाली नाही? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं. “आम्ही जाहिरनाम्यात एसटी विलीनीकरणाचा मुद्दा घेतला, मात्र करोनामुळे आर्थिक गणित कोलमडलं. करोनाच्या परिणामांमधून बाहेर पडल्यावर विलीनीकरणाचा पुन्हा विचार करता येईल,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्या लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एसटी महामंडळ विलीनीकरणाचा मुद्दा फार गुंतागुंतीचा होता. आम्ही जाहिरनाम्यात विलीनीकरणाचा मुद्दा घेतला तेव्हा त्याचा संदर्भ वेगळा होता. त्यानंतरच्या काळात करोनामुळे आर्थिक गणितं कोडमडली आणि मग आता ते करणं शक्य झालं नाही. मात्र, करोनाच्या परिणामांमधून बाहेर पडल्यानंतर ते विलीनीकरण करण्याचा विचार करता येईल.”

“एसटीच्या नेतृत्वातच एकवाक्यता नव्हती”

सुप्रिया सुळे यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद करण्यात सरकार अपयश ठरलं हा आरोप फेटाळला. “आम्ही अनेकदा संवाद केला. अजित पवार, अनिल परब, शरद पवार या सर्वांनी बैठका घेतल्या. मात्र, एसटीच्या नेतृत्वातच एकवाक्यता नव्हती,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“एसटी कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेल्या कृतीला मी हल्ला म्हणणार नाही”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “एसटी कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेल्या कृतीला मी हल्ला म्हणणार नाही, मी त्याला घटना म्हणेल. तिथं जे लोक आले होते ते आपल्या राज्यातील लोक होते. त्यांच्या मनात राग होता, तो कोणीतरी भरला असेल, मात्र ते आले होते कारण त्यांना वाटत होतं की त्यांचा प्रश्न सुटेल. आज राज्यात जे सरकार आहे त्याचे आम्ही अविभाज्य घटक आहोत. त्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आमची जबाबदारी आहे.”

“निकालानंतर ९,००० लोक गुलाल खेळून परत गेले, मग १०० लोक मागे का राहिले?”

“मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आदल्या दिवशी गुलाल खेळला गेला. आदल्या दिवशी ९,००० लोक गुलाल खेळून परत गेले होते, मग १०० लोक मागे का राहिले होते? त्याचा तपास पोलीस करतील. मात्र, जे लोक आले त्यांची मतं जाणून घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. ती आमची जबाबदारी वाटते,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“सरकारला अपयश आलं असं मी म्हणणार नाही”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्या घरावर हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्र सरकार कमी पडलं किंवा सरकारला अपयश आलं असं मी म्हणणार नाही. एखादा चुकीचा नेता मिळाला, तर संस्थेचं काय होतं याचं उदाहरण एसटी महामंडळ आहे. सरकार त्यांच्याशी बोलत होतं. मात्र, एक व्यक्ती त्यांच्याशी बोलत होता. त्यांच्याकडून ३०० रुपये प्रत्येकी गोळा करत होता. त्या व्यक्तीच्या घरी नवी गाडी येते आणि एसटी कामगारांचं काय?”

हेही वाचा : “मला हनुमान चालिसा म्हणता येत नाही हे मी प्रांजळपणे कबुल करते, मात्र…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

“एसटी कामगारांच्या १२१ आत्महत्यांचा आकडा कोठून आला?”

“आंदोलनातील महिला आणि एकूणच कामगार आंदोलना दरम्यान १२१ आत्महत्या झाल्या असं सांगत होत्या. एक आत्महत्या झाली तरी ते वाईटच आहे. मात्र, १२१ हा आकडा मोठा आहे, तो आकडा कोठून आला? तसं झालं असेल तर त्यावर उपाययोजनाही करायला हव्यात. नेता म्हणून एखाद्या व्यक्तिला केवळ शिव्या घालणं याला नेतृत्व म्हणत नाही. तुम्ही चर्चा करून कामगारांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आणल्या पाहिजे,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule comment on msrtc merger in state government pbs
First published on: 26-04-2022 at 23:02 IST