मुंबई : समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे.
महिलांकडून पुरुषांचे केस, कपडे याबाबत टिपण्णी केली जात नाही. मात्र, पुरुषांकडून सर्रासपणे केली जाते. पुरुषांनी कामाच्या ठिकाणी व्यावसायिक पद्धतीचे वागणे ठेवायला हवे, असे ठाम मत राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी रविवारी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील महिला पत्रकारांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुरुषांच्या चुकीच्या वृत्तीवर बोट ठेवताना सुळे यांनी त्यांच्या आयुष्यातील पुरुषांचे स्थानही अधोरेखित केले. माझ्या आयुष्यातील सर्व मोठे निर्णय पुरुषांनीच घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताधिकार दिला. जोतिबा फुले यांनी पुढाकार घेतला तेव्हा सावित्रीबाई शिक्षित झाल्या. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येक पुरुष वाईट नसतो, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकार जसे समाजातील सर्व घटकांना पारदर्शकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतात, तसेच राजकीय पक्ष देखील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. राज्यात, देशात फिरताना मला शौचालयांची संख्या वाढल्याचे दिसून येत नाही. आता २१ व्या शतकात देशात मोठे बदल झाले. मेट्रो, विमानतळे, रेल्वे आदी विविध मोठे प्रकल्प सुरु झाले आहेत. मात्र, शौचालयांसारखी मूलभूत सुविधाच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर मोठमोठे प्रकल्प काय कामाचे, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.
तसेच, भारताची विविधतेतील एकता ही देशाचे सौंदर्य आणि ताकद आहे. पण सद्यस्थितीत तीच विविधता कमकुवतपणा ठरत आहे. नागरिकांनी विविधतेचा आदर राखायला हवा. एखाद्याला बोलण्याचा अधिकार असेल, तर ऐकून घ्यायचीही हिंमत असायला हवी, त्यालाच सशक्त लोकशाही म्हणतात, असेही सुळे म्हणाल्या.
या संमेलनचा समारोप लोकसत्ताच्या फीचर एडिटर आरती कदम आणि सीएनबीसीच्या कन्सल्टिंग एडिटर लता व्यंकटेश यांचे मार्गदर्शन व अनुभवकथनाने झाला.
ज्येष्ठ महिला संपादक, पत्रकारांचा सहभाग
संमेलनात पत्रकारिता, माध्यम क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. पत्रकारितेतील वरिष्ठ नेतृत्व पदांवर महिलांची मर्यादा, माध्यम क्षेत्रातील महिलांची वाढती संख्या, महिला पत्रकारांसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय, ज्येष्ठ महिला संपादक आणि पत्रकारांचे अनुभव, मार्गदर्शन, एआयचा सुरक्षित वापर आणि मीडिया व्यवसायातील नवीन दिशा, कामाच्या ठिकाणची कायदेशीर चौकटी आणि संरक्षण आदी सत्रे घेण्यात आली. त्यात ज्येष्ठ पत्रकार कल्पना शर्मा, संपादक राही भिडे, मृणालिनी नानिवडेकर, सुकन्या शांता, जान्हवी पाटील, प्राची कुलकर्णी, शिरीन दळवी, अरुंधती रानडे, मानसी फडके, विदुला टोकेकर, मुक्ता चैतन्य, प्रीती सोमपुरा, स्वाती नाईक, मोहिनी जाधव, सुकेशनी नाईकवडे आदींनी आपापले विचार मांडले. त्यांच्याशी संध्या नरे- पवार, रेखा शेळके, प्रगती बाणखेले, अलका धुपकर यांनी संवाद साधला.
