राष्ट्रवादी हा पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या नेत्यांची एक मोळी आहे आणि त्याची रश्शी शरद पवार आहेत. ही माणसे दुसऱ्या पक्षात गेली तर निवडून येतील. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या सभेत म्हणाले होते. याचबरोबर, राजकीय वर्तुळातील अनेकांचं देखील असंच म्हणणं असल्याचं समोर आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलताना उत्तर दिलं.

राष्ट्रवादी हा पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या नेत्यांची एक मोट आहे, पक्ष म्हणून काही अस्तित्वात नाही अशी टीका केली जाते. या यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “तुम्ही असा का नाही विचार करत की प्रत्येक नेत्याला तेवढी स्वायत्तता दिली जाते पक्षात. हा देखील एक दुसरा बघण्याचा भाग आहे. आम्ही उगाच मायक्रो मॅनेज करत नाही. एखादा नेता मोठा होत असेल, तर आम्हाला त्याचा आनंद आहे. त्यामुळे काही असुरक्षितेची भावना नाही. अनेकदा मोठे पक्ष असतात परंतु खाली काहीच नसतं. जेवढे असमर्थ लोक तेवढा त्यांना आनंद असतो, हे मी दिल्लीत फार जवळून पाहते. की जे सक्षम लोक आहेत त्यांना मागे ठेवले आहे आणि जे त्यांच्या ऐकण्यातील आहेत, त्यांना खूप महत्वाच्या निर्णयाच्या ठिकाणी दिलं. ते किती निर्णय घेतात हा भाग वेगळा पण स्वाक्षरी तरी त्यांची चालते. त्यामुळे हा देखील एक मुद्दा आहे की बलाढ्य पक्ष नसूनही दुसरा कुठला पक्ष आहे देशात, राज्यात जिथे जर पाच-दहा नेते काढायचे की जे निवडून येऊ शकतात किंवा सरकारमध्ये त्यांना खूप अनुभव आहे, ज्याला उत्तम प्रशासन म्हणतो दुसऱ्या कुठल्या पक्षात आहे? आणि साधारण सगळे आजकाल बलाढ्य पक्ष व्हायला लागले आहेत.”

राष्ट्रवादी अजूनही शहरी पेक्षा ग्रामीण पक्ष म्हणूनच पाहिला जातो? –

तसेच, राष्ट्रवादी अजूनही शहरी पेक्षा ग्रामीण पक्ष म्हणूनच पाहिला जातो. यावरही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं “राष्ट्रवादी पुण्यात आहे, पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. आमच्याकडे नवी मुंबई होती, त्यामुळे पूर्णपणे नाहीच असं नाही म्हणता येणार, पण अनेकादा लोकांना असं वाटतं की, हा पक्ष जास्त ग्रामीण भागातला आहे आणि कदाचित मुख्य प्रभाव म्हणजे पुणे हे तर एक मोठं महत्वाचं शहर आहे. नाशिकमध्ये आमचं अस्तित्व आहे, जळगावमध्ये शहरात आमचं अस्तित्व आहे. परंतु मुंबई सारख्या शहरासाठी जेवढी मेहनत करायला पाहिजे किंवा कष्ट करायला पाहिजे, तेवढा आम्ही मुंबईला वेळ नाही दिला. मुंबई एका बाजूला सोडून संपूर्ण राज्य जर तुम्ही पाहिलं, तर पक्ष वाढतोय यात काही वाद नाही. पण मुंबई शहर शेवटी अर्बन ज्याला म्हणतो, तिथे आम्ही एवढी मेहनत नाही घेतली हे मी कबूल करते.” असं सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं.