दहा दिवसांत ५२ बळी; नाशिक जिल्ह्य़ात सर्वाधिक मृत्यू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसांत स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात जानेवारीपासून स्वाइन फ्लूचे चार हजार ८१० रुग्ण आढळले असून, ६ सप्टेंबपर्यंत बळींचा आकडा ५१९ पर्यंत पोहोचला आहे.

देशभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्य़ात या रोगाने यंदा सर्वाधिक म्हणजे ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल पुणे महापालिका क्षेत्रात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात दररोज सरासरी १४ हजार ५८१ जणांची तपासणी करण्यात येत असून, त्यातील दररोज ५३ रुग्णांमध्ये स्वाइन फ्लू या आजाराचे एच१एन१ विषाणू आढळून आले आहेत. राज्यपातळीवर स्वाइन फ्लूबाबत अभ्यास करणारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत सुमारे १५ लाख १ हजार १६४ नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. स्वाइन फ्लूच्या आजाराची लागण रोखण्यासाठी दररोज साधारण ३८३ संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर हे औषध दिले जाते. सध्या जिल्ह्य़ांतील विविध रुग्णालयांत या आजाराचे ५०२ रुग्ण दाखल आहेत. त्यामध्ये पुणे, नागपूर, चिंचवड मनपा, अहमदनगर येथील रुग्णांचा समावेश आहे.

मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग आदी आजार असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांनीही स्वाइन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी पोषक आहार, व्यायाम यांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

कुठे, किती मृत्यू?

नाशिक ५४, पुणे मनपा ४३, पुणे ग्रामीण ३८, नागपूर ३४, अहमदनगर ३३, ठाणे ३१, सातारा ३०, पिंपरी -चिंचवड मनपा ३०, कोल्हापूर २८, औरंगाबाद २६, मुंबई २०, अमरावती १५, अकोला १३, सांगली १३, सोलापूर ११, कल्याण-डोंबिवली १०, लातूर ८, बुलढाणा ७, वसई ६, विरार, ६, रत्नागिरी ६, नवी मुंबई ६, रायगड ५, मीरा-भाईंदर ४, परभणी ४, जळगाव ४, उस्मानाबाद ३, वाशीम ३, जालना ३, उल्हासनगर ३, पालघर ३, बीड २, धुळे २, भंडारा २, वर्धा २, सिंधुदुर्ग २, भिवंडी २, चंद्रपूर २, हिंगोली १, यवतमाळ १

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu in maharashtra
First published on: 11-09-2017 at 02:43 IST