चेन्नई शहरातील २०१५ सालच्या महापुरावेळी झालेल्या हाहाकारानंतर महापुराची पूर्वसूचना देणारी प्रणाली आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. चेन्नई शहरातील हवामानाच्या नोंदी, तलाव, नद्यांची पातळी, भरती-ओहटीच्या नोंदी यांच्या आधारे सहा ते ७२ तास महापुराचे पूर्वानुमान देता येते. अशाच प्रकारची प्रणाली मुंबईसाठीदेखील विकसित करता येऊ शकते.

चेन्नई शहरातील महापुरानंतर महापुराचे पूर्वानुमान देणारी यंत्रणा तयार करण्यासाठी आयआयटी मुंबईमधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक सुबीमल घोष यांच्या नेतृत्त्वाखाली देशभरातील विविध संस्थांमधील ३० शास्त्रज्ञांचा चमू गेली दीड वर्षे कार्यरत होता. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानंतर संपूर्णपणे संगणकाधारित अशी प्रणाली विकसित करण्यात आली. ‘हवामानाचे पूर्वानुमान देणाऱ्या राष्ट्रीय केंद्राकडून दुपारी ३ वाजता पूर्वानुमान दिले जाते. त्यानंतर पुढील दोन तासांमध्ये तीन दिवसांसाठीचे पूर्वानुमान नवीन प्रणालीच्या माध्यमातून दिले जाते. जर त्या काळात मोठय़ा प्रमाणात पूर येणार असेल तर दर सहा तासांनी सुधारित सूचना दिल्या जातात.

पूरपरिस्थितीचे प्रत्येक प्रभागानुसार त्रिमितीय नकाशे या प्रणालीमुळे मिळतात’, असे प्राध्यापक घोष यांनी सांगितले. अशीच प्रणाली मुंबईसाठीदेखील विकसित करता येऊ शकते असे त्यांनी सांगितले.

चेन्नईमधील २०१५ च्या पूरपरिस्थितीच्या वेळी असणाऱ्या नोंदीचा ताळा या प्रणालीद्वारे तपासून पाहिला असता, त्यामध्ये ८० टक्के अचूकता दिसून आली.

महापुराचे पूर्वानुमान देणाऱ्या प्रणालीबद्दल ‘करंट सायन्स’ या जर्नलमध्ये नुकताच लेख प्रकाशित झाला आहे. सध्या ही  प्रणाली ‘राष्ट्रीय सागरी किनारपट्टी संशोधन केंद्रा’कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर केला जात असून पुढील वर्षभरात ती पूर्णपणे कार्यरत होईल.