मुंबई : राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) कारवाई करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील सामाजिक शांतता बिघडू नये, दंगली होऊ नयेत, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबाद येथे सभा घेण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंगे लावण्यास विरोध केला आहे. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मुदत त्यांनी राज्य सरकारला दिली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याचे जाहीर केले आहे. ठाकरे यांच्या सभेमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, दंगली होऊ शकतात, त्यामुळे वंचित आघाडीने त्या सभेला विरोध केला आहे. औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे, राज ठाकरे यांच्या सभेमुळे तेथे काही घडू शकते, त्यामुळे त्याला आघाडीचा विरोध असल्याचे सांगितले.