मुंबई : मोटारींच्या काचेवर टकटक करून किंवा मोटारीच्या खाली पैसे पडल्याचे चालकाला सांगून मोटीरीतील महागडय़ा वस्तू चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला मुंबई पोलिसांनी तमिळनाडूमधून नुकतीच अटक केली. यासाठी तब्बल दोनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले.

मुंबई आणि  नवी मुंबई परिसरात सक्रिय असलेल्या या आंतरजिल्हा टोळीचा चोरीच्या अनेक घटनांमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. लक्ष्मण एस. कुमार(३५) असे आरोपीचे नाव आहे. तो तमिळनाडू येथील रहिवासी आहे.

ओशिवरा पोलिस ठाण्यात टकटक टोळीने केलेल्या चोरीबाबत गेल्या महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार व्यक्ती ही आदर्श नगर पेट्रोल पंपासमोर मोटारीत बसलेली असताना एका अनोळखी व्यक्तीने मोटारीच्या खाली पैसे पडले असल्याचे त्यांना सांगितले. ते पैसे घेण्यासाठी खाली उतरल्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने मोटारीतून बॅग लांबवली.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींकडून लॅपटॉपसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरोधात माटुंगा व चेंबूर परिसरात अशाच प्रकारे चोरी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे काही साथीदार मुंबई व नवी मुंबईत सक्रिय असल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे.

तपासचक्र..

टकटक टोळीने केलेल्या गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपीला अटक केली. या साठी सरकारी, खासगी तसेच अंधेरी रेल्वे स्थानक, दादर रेल्वे स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरातील २५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तपासले. यानंतर आरोपीचे छायाचित्र मिळवले. आरोपी हा तमिळनाडू येथील रहिवासी असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तमिळनाडूतील श्रीरंगम परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.