तानसा तलावातून मुंबईत पाणी आणणारी जलवाहिनी बुधवारी एकाच वेळी तीन ठिकाणी फुटल्याने लाखो गॅलन पाणी तर फुकट गेले. त्यामुळे संपूर्ण शहरात आज गुरुवारी ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम २४ तासांत पूर्ण करण्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
गुंदवली येथे २४०० मि.मी. व्यासाची तानसा जलवाहिनीच्या जोडणीचे काम २५ जून रोजी हाती घेण्यात आले होते. मध्यरात्री ते पूर्ण झाले. यासाठी १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. काम पूर्ण होताच जलवाहिनीतून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र रात्री दीडच्या सुमारास भिवंडीतील आग्रा रोड व्हॉल्व कॉम्प्लेक्स येथे तानसा जलवाहिनी फुटली. हे लक्षात येताच जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तातडीने जलवाहिनीतील पाणीपुरवठा बंद केला. त्यापाठोपाठ चिंचवली आणि के. बी. ब्रिज येथे पूर्व जलवाहिनी फुटली. या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून येत्या २४ तासांत ते पूर्ण होईल, असा दावा पालिकेच्या जलविभागाकडून करण्यात आला आहे. जलवाहिनी तीन ठिकाणी फुटल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला असून पालिकेच्या जी-दक्षिण आणि जी-उत्तर विभागांमधील नागरिकांना बुधवारी टिपूसभर पाणीही मिळू शकले नाही. तसेच २७ जून रोजी मुंबईत ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
तानसा जलवाहिनी १९२५ मध्ये टाकण्यात आली असून ती जीर्ण झाली आहे. ही जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू असून आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित १५ टक्के काम डिसेंबपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होणार नाहीत, असा दावा जलविभागाकडून करण्यात आला आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे हे १५ टक्के काम रखडले आहे.