घरगुती ग्राहकांवर ३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त मासिक भार

मुंबई : राज्यातील वीजग्राहकांवर एप्रिल २०२० पासून दरवाढीची  टांगती तलवार असताना त्याआधीच महावितरणने इंधन समायोजन आकाराच्या रूपाने जानेवारीतील वीजवापरापोटी प्रति युनिट ५५ पैसे ते १.४० रुपयांचा भार वीजग्राहकांवर टाकला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना येत्या महिन्यापासून मासिक वीजबिलांमध्ये साधारण २०० ते ३०० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने ५९२७ कोटी रुपयांच्या वीजदरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे.  दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर हा ८ टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. ३०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने केली आहे.

या वार्षिक दरवाढीच्या प्रस्तावावर वीज नियामक आयोग निर्णय घेणार आहे. त्याआधी ऑक्टोबर २०१९ मधील वीजखरेदीवरील जादा खर्चापोटी इंधन समायोजन आकार वसूल करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. जानेवारीचे वीजदेयक तयार करताना सर्व गटातील ग्राहकांवर हा आकार लावण्याचा आदेश महावितरणने राज्यातील सर्व परिमंडळांना दिला आहे. त्यामुळे फेब्रुवारीत महावितरणच्या राज्यातील दोन कोटी ५५ लाख ग्राहकांवर या वाढीव दराचा भुर्दंड पडणार आहे. दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ५५ पैसे, १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्यांना ९४ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ५०० युनिट वापरणाऱ्यांना १.१९ रुपये प्रति युनिट, ५०१ ते एक हजार युनिट वीज वापरणाऱ्यांना १.३२ रुपये प्रति युनिट तर दरमहा एक हजार रुपयांपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्यांना प्रति युनिट १.४० रुपये इतका अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल. लघुदाब औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट ६२ पैसे ९६ पैसे तर उच्चदाब ग्राहकांना ८० पैसे इंधन समायोजन आकार लावण्यात येणार आहे.

होणार काय?

फेब्रुवारीपासून दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना सुमारे ५५ रुपयांचा, ३०० युनिट वीजवापरणाऱ्यांना २८२ रुपयांचा तर ५०० युनिट वीजवापरणाऱ्यांना ५९५ रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड पडणार आहे. राज्यातील सुमारे दोन कोटी ५५ लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.

कारण काय?

ऑक्टोबर २०१९मध्ये वाढती वीजमागणी भागवण्यासाठी एनटीपीसीच्या काही प्रकल्पांसह अन्य काही ठिकाणाहून महाग वीज घ्यावी लागली. त्यामुळे त्या वाढीव खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी  इंधन समायोजन आकार वाढवण्यात आल्याचे महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.