कोळसारूपी इंधनाच्या चढय़ा दरांपोटी रोकड टंचाईचा सामना करणाऱ्या टाटा पॉवरने इंडोनेशियातील अरुतमाइन खाणीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीतील ३० टक्के हिस्सा बाक्री समूहाला विकून कंपनीने ५० कोटी डॉलर रक्कम जमा केली असून तिचा उपयोग कंपनीला कर्ज कमी करण्यासाठी होईल.
टाटा समूहातील वीजनिर्मिती व वितरण क्षेत्रातील टाटा पॉवर कंपनीच्या मुंद्रा प्रकल्पासाठी इंडोनेशियातील अरुतमाइन खाणीतून कोळसा मिळतो. त्यासाठी टाटासह काही कंपन्यांची भागीदारी आहे. मात्र कंपनीने रोकड चणचण दूर करण्यासाठी या खाणीतील आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला. अरुतमाइन ही इंडोनेशियातील कोळसा व्यवहार व पायाभूत क्षेत्रातील कंपनी आहे.
टाटा पॉवर इंडोनेशियातील कातीम प्रायमा कोलमधील हिस्सा कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान इंधनाच्या किमतींचे चित्र पाहता एकूणच कोळसा खाण क्षेत्र आव्हानात्मक बनले असून अरुतमाइनमधील हिस्सा विक्रीने कंपनीला आर्थिक सहकार्य मिळेल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सारधना यांनी म्हटले आहे.