मुंबईत बनावट नोटांच्या  प्रकरणात दोन टॅक्सीचालकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. धारावी पोलिसांनी बनावट नोटा बाळगणाऱ्या दोन चालकांना अटक केली आहे. किरकोळ विक्रेत्यांसह टॅक्सीत बसणाऱ्या ग्राहकांनाच ते बनावट नोटा खपवत होते.
बांगलादेशातून मुंबईत मोठय़ा प्रमाणावर बनावट नोटा आणून त्या वटवल्या जात असल्याचे उघड झाले आहे. बनावट नोटा बाजारात खपविण्यासाठी टॅक्सीचालकांचा वापर होऊ लागला आहे. धारावीतील दोन टॅक्सीचालक बनावट नोटांचा व्यवहार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धारावी बसस्थानकासमोर सापळा लावून इनाम उल उस्मान शेख (४०) आणि जुल्फर ऊर्फ रफिक शेख (३५) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे पाचशे व हजाराच्या एकूण १ लाख २० हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. त्यांच्याकडील टॅक्सी (एम एच ०३ ए एफ ५८१२) सुद्धा जप्त केली आहे. त्यांना या बनावट नोटा देणाऱ्या इसमाचा पोलीस शोध घेत आहेत. या नोटा कुठून आणल्या आणि इतर टॅक्सीचालक यात सहभागी आहेत का, याचा तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.