मुंबई: सीएनजीच्या किमतीत गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड टॅक्सीचालकांना पडत आहे. ही वाढ चालकांनाही परवडणारी नसल्याने टॅक्सीच्या भाडेदरात किमान पाच रुपये वाढ करावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. वाढ न केल्यास संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगर गॅस कंपनीने सीएनजीच्या किमतीत प्रतिकिलो ३ रुपये ०६ पैशांनी वाढ केली आहे. २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ लागू झाली. या वाढीमुळे सीएनजीचे दर प्रतिकिलोमागे ६१ रुपये ५० पैसे झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या दरात तीन वेळा वाढ झाली. यामुळे टॅक्सीचालकांना त्याचा फटका बसू लागला आहे. मुंबईत साधारण ३५ हजार काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी या सीएनजीवरच धावतात. गेल्या काही वर्षांत न मिळालेली भाडेवाढ यामुळे टॅक्सींचे किमान भाडे मार्च २०२१ पासून २२ रुपयांहून २५ रुपये झाले होते.

परंतु सातत्याने होणाऱ्या सीएनजी दरातील वाढीमुळे चालकांना नुकसान होत असून उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती असल्याचे युनियनचे महासचिव ए.एल. क्वाड्रोस यांनी सांगितले. सध्या प्रत्येक चालकाला प्रत्येक दिवशी १०० रुपये नुकसान होऊ लागले आहे. होणारे नुकसान पाहता किमान भाडेदरात पुन्हा वाढ करण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे टॅक्सीच्या किमान भाडेदरात आणखी पाच रुपयांनी वाढ करावी. त्यामुळे भाडेदर २५ रुपयांहून ३० रुपये होईल. ही वाढ त्वरित न केल्यास संपावर जाण्याचा इशारा क्काड्रोस यांनी दिला आहे. भाडेवाढीसाठी शासनाकडेही सोमवारी पत्रव्यवहारही केला जाणार आहे.

यापूर्वी दोन वेळा वाढ ..१४ ऑक्टोबर २०२१ पासून सीएनजीच्या दरात २ रुपये ३० पैसे इतकी वाढ झाली होती. त्याआधी ४ ऑक्टोबरला प्रतिकिलो ५१ रुपये ९८ पैसे असलेला दर वाढून तो ५४.५७ पैसे झाला होता. त्यामुळे टॅक्सी भाडेदरात किमान तीन रुपये वाढ करण्याची मागणी युनियनने तेव्हा केली होती. आता पुन्हा सीएनजीचे दर वाढल्याने किमान भाडेदरात एकूण पाच रुपये वाढ करण्याची मागणी पुन्हा केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taxi drivers likely to go on strike demands to hike in fare rate zws
First published on: 28-11-2021 at 03:30 IST