रोजीरोटीसाठी सकाळपासून उपाशीपोटी वणवण, सकस आहाराचा अभाव आणि उपचारांतील धरसोड आदी कारणांमुळे सध्या मुंबईमध्ये ‘एक्सडीआर टीबी’या जीवघेण्या रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे या क्षयाच्या २६ रुग्णांचीच नोंद झाली असली तरी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या अशा रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास पोहोचली आहे. एमडीआर टीबीबाबत जनजागृती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेल्या पालिकेला आता ‘एक्सडीआर टीबी’विरुद्ध लढा द्यावा लागणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईत क्षय वाढत आहे. पहिल्या टप्प्यातील क्षयरुग्णांवर पालिकेकडून सामान्य उपचार (डॉट) केले जातात. परंतु क्षयरोग दडविण्याची वृत्ती बळावत चालली आहे. सकस आहाराचा अभाव आणि उपचारातील धरसोड वृत्ती यामुळेही क्षयरोग बळावतो आणि रुग्ण ‘एमडीआर टीबी’ग्रस्त (मल्टी ड्रग रेझिस्टंट) होतो. हा क्षयरोगाचा पुढचा प्रकार आहे व त्यावर काळजीपूर्वक उपचार करावे लागतात.
मुंबईत वृद्धांच्या तुलनेत अधिक तरुणांना ‘एमडीआर टीबी’ झाल्याचे आढळून आले आहे. तरुण मंडळी सकाळी न्याहारी न करताच घराबाहेर पडतात. कामाच्या नादात दुपापर्यंत काहीच खात नाहीत. वाढत्या महागाईमुळे रस्त्यावरील स्वस्त परंतु निकृष्ट पदार्थ खाऊन भूक भागविण्याकडे कल असल्याने अनेक तरुण क्षयरोगाचे बळी ठरत आहेत. क्षयग्रस्त रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही तो होऊ शकतो.
क्षयरोगाची लक्षणे
१५ दिवसांपेक्षा जास्त खोकला, संध्याकाळी बारीक ताप येणे, अचानक वजन कमी होणे, भूक मंदावणे.
कशामुळे होतो?
बराच वेळ उपाशी राहणे, जेवणात सकस आहाराचा अभाव, उपचारांतील अनियमितता.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2013 रोजी प्रकाशित
जीवघेण्या क्षयरोगाचा फेरा
रोजीरोटीसाठी सकाळपासून उपाशीपोटी वणवण, सकस आहाराचा अभाव आणि उपचारांतील धरसोड आदी कारणांमुळे सध्या मुंबईमध्ये ‘एक्सडीआर टीबी’या जीवघेण्या रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे.
First published on: 28-02-2013 at 03:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tb disease spreding in city