तीव्र उन्हाळ्यामुळे वातानुकुलित लोकलला मिळणारा प्रतिसाद वाढला असताना गेल्या दोन महिन्यापासून पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या बिघाडाचे सत्र सुरूच असून प्रवासी हवालदिल झाले आहेत. सोमवारी विरार ते चर्चगेट जलद वातानुकूलित लोकलमधील दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली. त्यामुळे प्रवाशांना उकाडा असह्य होऊ लागला. काही कालावधीनंतर बिघाड दुरूस्त करून लोकल मार्गस्थ करण्यात आली.
हेही वाचा >>> Apple WWDC 2023 Live: iOS 17 अपडेटमध्ये मिळणार कॉन्टॅक्ट पोस्टर फिचर, महत्वाच्या अपडेट्स एकाच क्लिकवर




पश्चिम रेल्वेकडून वारंवार वातानुकूलित लोकलची जाहिरातबाजी केली जाते. दुसरीकडे प्रवाशांना वातानुकूलित लोकलमधून गैरसोयीचा प्रवास करावा लागत आहे. अधिक पैसे मोजूनही आरामदायी प्रवासाचा लाभ मिळत नसल्याने प्रवासी पश्चिम रेल्वेच्या कारभारावर नाराज झाले आहेत. विरार ते चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा सोमवारी दुपारी १२.२० मिनिटांनी बिघडली. वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद असल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी बोरिवली स्थानकात तक्रार केली. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिक विभागाच्या पथकाने बिघाड दुरूस्त केला. मात्र एकाच डब्यातील वातानुकूलित यंत्रणा सुरू झाली. दुसऱ्या डब्यातील यंत्रणा बंदच राहिली. अखेरीस लोकल चर्चगेटकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे चर्चगेट दिशेकडे जाणाऱ्या अनेक लोकल एका मागोमाग खोळंबल्या होत्या. तसेच जलद लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होती.
वातानुकुलित लोकलच्या बिघाडाचे सत्र
५ जून रोजी दुपारी १२.२० वाजता विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली.
२४ मे रोजी सकाळी ७.५६ वाजताच्या विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली.
२१ एप्रिल रोजी सकाळी ७.१५ च्या विरार – चर्चगेट लोकल रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला.
२१ एप्रिल रोजी सकाळी ८.३५ वाजेची विरार-चर्चगेट वातानुकूलित लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. –