‘तहलका’ नियतकालिकाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियतकालिकेचे ‘गाडलेले मुडदे उकरले जात आहेत, ’ असे भाष्य केले.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन आणि याकूब मेमन यांचा उल्लेख करून दहशतवादी कोण, असा सवाल तहलकामध्ये उपस्थित करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेनेने काही ठिकाणी निदर्शनेही केली. यासंदर्भात ठाकरे यांना विचारता ‘संपादक बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे, ते सुटले का, ’ असा खोचक सवाल करीत त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असे स्पष्ट केले.दरम्यान, हे नियतकालिक सुरू आहे की नाही, याचाही कोणाला पत्ता नव्हता. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मान्यवर नेत्यांवर टीकाटिप्पणी करण्याचे उद्योग केले असावेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
संपादकांविरुद्ध  नगरमध्ये गुन्हा
शिवसेनेच्या तक्रारीनुसार नगरमधील कोतवाली पोलिसांनी रविवारी तहलका साप्ताहिकाचे संपादक मॅथ्यू सॅम्युएल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यासंदर्भात माजी आमदार अनिल राठोड यांनी फिर्याद दिली आहे. शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता.