scorecardresearch

“उद्धव ठाकरे आणि मी दोघं भाऊ वाटतो कारण…”, मुंबईतील भेटीनंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

केसीआर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मी दोघं भाऊ वाटतो असं म्हटलं. तसेच त्यामागील कारणही सांगितलं.

देशात पुन्हा एकदा भाजपाविरोधी आघाडीच्या प्रयत्नांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देशपातळीवर भाजपा आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आघाडी उभारण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केसीआर यांनी उद्धव ठाकरे आणि मी दोघं भाऊ वाटतो असं म्हणत त्यामागील कारण सांगितलं.

के. चंद्रशेखर राव म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि मी आम्ही दोघं भाऊ वाटतो. कारण आमच्या राज्यांची तेलंगणा आणि महाराष्ट्राची १,००० किलोमीटरची संयुक्त सीमा आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आम्ही खूप चांगला प्रकल्प तयार केला. त्यामुळे तेलंगणाचं नशिब उजळलं आहे. आम्ही कालेश्वरम प्रकल्प तयार केलाय. त्याचा खूप फायदा झाला. यापुढील काळातही आम्हाला महाराष्ट्रासोबत मैत्री निभवायची आहे. कारण तेलंगणा आणि महाराष्ट्राची १,००० किमीची सीमा आहे.”

“देशात एका मोठ्या बदलाची गरज आहे”

“आज ज्या प्रकारे देशातील कारभार सुरू आहे त्यात बदल व्हायला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात देशात ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. त्यामुळे देशात एका मोठ्या बदलाची गरज आहे यावर आमचं एकमत झालंय. देशातील वातावरण खराब करायला नको. सर्व लोकांनी प्रेमाने एकमेकांसोबत काम करून मिळून मिसळून मजबूत हिंदुस्थान निर्माण करावा, अशीच आमची इच्छा आहे. यासाठी इतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसोबतही चर्चा करू,” असं केसीआर यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो”

के. चंद्रशेखर राव म्हणाले, “महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांकडून देशाला खूप प्रेरणा मिळाली. त्याच प्रेरणेवर आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. अनैतिक गोष्टींविरुद्ध आम्हाला लढायचं आहे. आमच्या दोघांमध्ये आज जी चर्चा झाली त्याचा पुढील काही काळातच खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल.”

“महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळालं”

“मी तेलंगणाची जनता आणि माझ्यावतीने उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्यासाठी आमंत्रित करतो. आज महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळालं. हे प्रेम आम्ही सोबत घेऊन जातो आहोत. या प्रेमाचा परतावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असं केसीआर यांनी सांगितलं.

“सर्व विषयांवर आमचं एकमत झालं आणि आम्ही एकजूट आहोत”

केसीआर म्हणाले, “देशाचं राजकारण, देशाच्या विकासाची गती, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाची स्थिती यावर चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून खूप आनंद झाला. आम्ही अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर आमचं एकमत झालं. यापुढे देशाच्या विकासासाठी, देशात चांगल्या सुधारणा करण्यासाठी, विकासाची गती वाढवण्यासाठी, धोरण बदलावरही चर्चा झाली. या सर्व विषयांवर आमचं एकमत झालं आणि आम्ही एकजूट आहोत.”

हेही वाचा : “स्वतःचं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी एका रात्रीत बायकोचे १९ बंगले तोडले आणि…”, सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

“पुढील काळात एकत्र काम करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. देशात असे अनेक लोक आहेत जे आमच्यासारखा विचार करतात. त्या लोकांसोबत देखील माझी चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरेंसोबतही चर्चा सुरू होती. काही दिवसातच हैदराबाद किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व लोक एकत्रित भेटू आणि चर्चा करून एक मार्ग ठरवू,” असंही चंद्रशेखर राव यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Telangana cm kcr say we are brothers after meeting with uddhav thackeray in mumbai pbs

ताज्या बातम्या