शैलजा तिवले
करोना महामारीच्या काळात डॉक्टरांना प्रत्यक्ष उपस्थित न राहता वैद्यकीय सेवा देता येणाऱ्या टेलीमेडिसीन सुविधेची तातडीची गरज लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर के ली आहेत. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) किंवा मशीन लर्निगच्या आधारित टेलीमेडिसीन अप, वेबसाइटच्या माध्यमातून रुग्णांना औषधे लिहून देणे किंवा त्यांचे समुपदेशन करण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट केले आहे.
संचारबंदी किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये वैद्यकीय सेवा खंडित होऊ नये यासाठी डॉक्टरांनी टेलीमेडिसीनचा वापर करण्याचे सूचित केले जात आहे. मात्र २०१८ मधील मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे याचा वापर कसा, केव्हा आणि कशासाठी करावा याबाबत संभ्रमता असल्याने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित के ली आहेत.
यानुसार, वैद्यकीय सुविधा जवळ उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीमध्ये प्रथमोपचार, जीव वाचविणारे उपचार, समुपदेशन आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला या सेवा टेलीमेडिसीनच्या माध्यमातून डॉक्टर देऊ शकतात. नवीन रुग्णांना टेलीमेडिसीनद्वारे औषधे लिहून देण्यापूर्वी व्हिडीओच्या माध्यमातून आजाराचे निदान करावे.
कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित अॅपचा किंवा वेबसाइट यांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यास परवानगी नसून डॉक्टरांनी स्वत: फोनच्या माध्यमातून लेखी, व्हिडीओ किंवा ऑडिओ पद्धतीने रुग्णाशी संवाद साधूनच उपचार करावेत असे यात स्पष्ट केले आहे.
टेलीमेडिसीनचा वापर रुग्णांसह आरोग्य कर्मचारी, इतर डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी करू शकतात. डिजिटल पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यासाठी मात्र याचा वापर करू नये. परदेशातील रुग्णांना टेलीमेडिसीनद्वारे सेवा देऊ नये, असे यात म्हटले आहे.
टेलीमेडिसीनद्वारे सेवा देण्यासाठी डॉक्टर क्लिनिकप्रमाणे शुल्क आकारू शकतात. तसेच रुग्ण-डॉक्टर यांची ओळख, संवाद साधण्याचे माध्यम, सल्ला, तपासणी, औषधे लिहून देण्याची नियमावली सविस्तर यात नमूद केली आहे.
शेडय़ुल ‘एक्स’ची औषधे देण्यास मनाई
शेडय़ुल ‘एक्स’अंतर्गत येणारी औषधे आणि नार्कोटिक्स व सायकोट्रॉपिस्कस सबस्टेन्स कायद्याअंतर्गत येणारे अमली व मादक पदार्थ टेलीमेडिसीनद्वारे देण्यास परवानगी नाही.
