टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील ३१ जुलैच्या बलात्कारप्रकरणी पोलिसांना परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणातला फरार मोहम्मद अश्फाक बुधवारीही पोलिसांच्या हाती लागला नसून त्याच्या शोधासाठी एक पथक हैदराबादला रवाना झाले आहे.
भांडुप येथील १९ वर्षीय तरुणीवर महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये पाच तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण सोमवारी रात्री उघडकीस आले होते. पोलिसांनी मंगळवारी रात्री गोटय़ा नावाच्या १७ वर्षीय आरोपीला अटक केली. पण दुसरा आरोपी मोहम्मद अश्फाक शेख फरार झाला होता. मुंब्रा येथे राहणारा अश्फाक विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याच्यावर मुंबई रेल्वे सेंट्रल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याचे घर गाठले तेव्हा त्याच्या पत्नीने आमचा ‘तलाक’ झाला असून तो इथे राहात नसल्याचे सांगितले. शक्ती मिलच्या प्रकरणात पोलिसांनी या अश्फाकला संपर्क केला होता. तेव्हापासूनच तो फरार झाला होता. बुधवारी दिवसभर पोलिसांची विविध पथके विविध भागात त्याचा शोध घेत होती. त्याला पकडण्यासाठी एक पथक हैदराबादलाही रवाना झाले आहे.
परिस्थितीजन्य पुरावे
बलात्काराची घटना घडून एक महिना उलटल्यानंतर पोलिसांना वैद्यकीय पुरावे मिळणे कठीण बनले होते. परंतु त्यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांवर भर दिला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली. छायाचित्रकार तरुणी आणि टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर शक्ती मिलमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला. दोन्ही जागा जवळजवळच आहेत. त्या ठिकाणाहून पोलिसांना पीडित तरुणीची ओढणी, तिचे फाटलेले कपडे तसेत एका आरोपीचा फाटलेला शर्ट सापडला आहे. या मुलीने प्रतिकार केला तेव्हा झटापटीत एका आरोपीचा शर्ट फाटला होता. पीडित तरुणीचा जबाब, तसेच साक्षीदार असलेला तिच्या मित्राचा जबाबही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आरोपींच्या मोबाईचे टॉवर लोकेशन याच ठिकाणी असल्याचेही सिद्ध झाले असून तो सुद्धा महत्त्वपूर्ण पुरावा ठरणार आहे.
शक्ती मिलमध्ये सुरक्षा व्यवस्था
या घटनेनंतर पोलिसांनी शक्ती मिल परिसरात सावधानतेचा इशारा देणारे फलक लावले असून त्यावर पोलीस ठाण्याचे क्रमांक ठळक अक्षरात लिहिले आहेत. या शिवाय रेल्वेलाही पत्र पाठवून येथील रस्ता बंद करण्याची सूचना केली आहे. शक्ती मिलच्या अधिकृत लिक्विडेटर रूपा सुतार यांना पत्र पाठवून २४ तासाच्या आत शक्ती मिलमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.