विदर्भ, मराठवाडय़ापेक्षा कोकणात उष्मा अधिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तापमानात नेहमीच कोकणापेक्षा पुढे असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाला मागे टाकत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या पट्टय़ात दोन दिवस तापमानाने वरचा टप्पा गाठला. या ठिकाणांवरील कमाल तापमान सरासरीपेक्षा तब्बल पाच अंश से.पेक्षा जास्त राहिले. मुंबईत ३६.८ अंश से. तर भिरा येथे राज्यातील सर्वाधिक ४०.८ अंश से. तापमानाची नोंद झाली. गुजरातवरून येत असलेल्या वाऱ्यांच्या उष्ण लहरींमुळे कोकण तापले असून मंगळवारी मात्र तापमानात दोन अंश से.ने घसरण होण्याची शक्यता आहे.

समुद्राच्या सान्निध्यामुळे कोकण परिसरातील हवा वेगाने तापत नाही. बाष्पयुक्त वारे तापमान नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील कोरडय़ा हवेच्या तापमानापेक्षा कोकणातील तापमान नेहमीच कमी असते. मागील दोन दिवसांत मात्र उलट स्थिती आहे. ठाणे ते रत्नागिरी या परिसरात अंतर्गत भागापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. रविवारी मुंबईत ३७.६ अंश से. तर रत्नागिरी येथे ३८.३ अंश से. तापमान होते. त्याच वेळी विदर्भ, मराठवाडा येथे कमाल तापमान ३५ ते ३६ अंश से. एवढे होते. सोमवारीही मुंबईत सांताक्रूझ येथे ३६.८ अंश से. व रत्नागिरी येथेही ३६.८ अंश से. तापमानाची नोंद झाली. तर भिरा येथे पारा तब्बल ४०.८ अंश से.पर्यंत पोहोचला. हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे.

गुजरातमध्ये हवेच्या खालच्या थरात प्रतिचक्रवात स्थिती होती. ही स्थिती चक्रीवादळाच्या विरुद्ध असते. आजूबाजूच्या परिसरात हवेचा दाब कमी झाल्याने या भागातून वारे चहुबाजूंना वाहतात. या स्थितीमुळे गुजरातमधून उष्ण वारे कोकण किनारपट्टीवर येत होते. त्यामुळे ठाणे ते रत्नागिरी या पट्टय़ातील हवा अधिक तापली, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. साधारण मार्चमध्ये पश्चिमेकडून येणारे वारे प्रभावी ठरल्यावर उन्हाळ्याची स्थिती येते. मात्र, त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये अशा प्रकारे कोकणमधील तापमान राज्याच्या इतर भागांपेक्षा काही वेळा वाढते. गेल्या वर्षीही फेब्रुवारीत अखेरच्या आठवडय़ात अशी स्थिती निर्माण झाली होती.

रविवार व सोमवारी कोकणातील बहुतांश जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा तापमानात पाच ते सहा अंश से. ने वाढ झाली. मात्र मंगळवारी तापमानात किंचित घट होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

उष्णतेची लाट का नाही?

सतत दोन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंश से.ने अधिक राहिले तर त्या ठिकाणी उष्णतेची लाट असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर केले जाते. मार्च ते मे महिन्यांत देशाच्या अनेक भागांत उष्णतेच्या लाटा येतात. मात्र मुंबई ते रत्नागिरी पट्टय़ातील तापमान तिसऱ्या दिवशी कमी होण्याची शक्यता असल्याने उष्णतेची लाट जाहीर करण्यात आली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature increase in mumbai
First published on: 27-02-2018 at 03:47 IST