मुंबई-नाशिक महामार्गावरील कोशिंबी गावच्या हद्दीत एका चालकास मारहाण करून त्याच्या टेम्पोमधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लुटून पळालेल्या सात जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांचे तीन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
चंद्रकांत उर्फ पिंटय़ा बाळाराम म्हस्कर (२४, रा. अंबरनाथ), सुरेश चंद्रकांत वेहले (२२, रा. रायगड), कुणाल उर्फ बाटय़ा द्वारकानाथ म्हात्रे (१९, रा. कल्याण), रामदास कांताराम वेहळे (२५, रा. रायगड), नवनाथ चरपट पाटील (२४, रा. भिवंडी), सुरज काशिनाथ डायरे (१९, रा. रायगड), अनिल तानाजी कोळेकर (२६, रा. नवी मुंबई), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील वडगावमध्ये राहणारे बाळू कारभारी हुल्लुळे (३१) हे व्यवसायाने वाहन चालक असून १३ सप्टेंबर २०१२ रोजी ते मुंबई-नाशिक महामार्गावरून इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी भरलेला टेम्पो नाशिककडे घेऊन जात होते. त्यावेळी कोशिंबी गावाच्या हद्दीत कार आणि तीन मोटारसायकलवरून आलेल्या दहा जणांनी त्यांचा टेम्पो अडवून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे डोळे बांधून खिशातील दहा हजार रोख रक्कम काढून घेतली. तसेच मुरबाड येथील टोकावडे गावाजवळ टेम्पो नेऊन त्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरल्या आणि टेम्पोमध्ये हातपाय बांधून बाळू यांना सोडून दिले.
 या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्या पथकाने तपास करून ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवस करीत आहेत.