मुंबई: बहुचर्चित अशा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील राज्यातील अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या अशा वांद्रे कुर्ला संकुल ते कल्याण शिळफाटा या २०.३७ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत मार्च २०२२ आहे.

या बोगद्याची खोली २५ ते ४० मीटर एवढी असेल. हा भुयारी मार्ग ठाणे खाडीमार्गे जाईल. यासाठी एक सर्वेक्षणही हाती घेण्यात आले होते. तेदेखील पूर्ण झाल्याचे कॉपरेरेशनकडून सांगण्यात आले. २०.३७ किलोमीटरपैकी सात किलोमीटरचा भुयारी मार्ग हा समुद्राखालून असून हे काम करण्यासाठी नवीन ऑस्ट्रिॅयन पद्धत अवलंबली जाणार आहे. हे काम तीन टप्प्यांत केले जाईल. निविदा प्रक्रिया सुरु केल्याने राज्यातील बुलेट ट्रेनच्या कामाला गतीच दिली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा ५०८ किलोमीटर लांबीचा असून वांद्रे कुर्ला संकुल येथून सुरुवात होईल. या स्थानकासाठीही लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

भूसंपादनाची गती मंदावलेलीच

बुलेट ट्रेन प्रकल्पात राज्यातील भूसंपादनाची गती मंदावलेलीच आहे. महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये भूसंपादन अधिक झाले आहे. या प्रकल्पासाठी एकूण १ हजार ८४ हेक्टर जागा लागणार असून त्यातील १,३९६ हेक्टर भूसंपादन म्हणजेच ७७ टक्के संपादन पार पडले आहे. यात गुजरातमध्येच ९३३.५२ हेक्टर जागा लागणार असून ९७ टक्के भूसंपादन झाले आहे. महाराष्ट्रात ४३२.६७ हेक्टर भूसंपादनाची गरज असून १४३.०६ हेक्टर संपादन झाले आहे. राज्यात भूसंपादनाचे प्रमाण केवळ ३३.०६ टक्के आहे.