‘सीबीएसई’चा निकाल ३१ जुलैपर्यंत; मूल्यांकनाचे सूत्र तयार

 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दहावीतील गुण, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे जाहीर करण्यात येणार असून बारावीच्या वर्षभरातील कामगिरीसाठी ४० टक्के गुण असतील. मंडळाने निकालाचे सूत्र गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले. ‘सीआयएससी’ईनेही केंद्रीय मंडळाप्रमाणेच निकालाचे सूत्र असल्याचे सांगितले. सीबीएसईचा बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंडळाची बारावीची परीक्षा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बारावीच्या गुणांआधारे विद्यापीठे आणि उच्चशिक्षण विद्याशाखांमधील प्रवेश होत असल्याने या मूल्यांकनाबाबत प्रशद्ब्रा उपस्थित झाले होते. दरम्यान बारावीच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मूल्यांकनाचे सूत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मंडळाने नेमलेल्या समितीने निकालाचे सूत्र तयार केले असून ते गुरुवारी न्यायालयात सादर केले. त्यानुसार दहावी, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षातील चाचण्या, सराव परीक्षा यांच्या गुणांनुसार निकाल जाहीर करण्यात येईल, असे मंडळाने न्यायालयात सादर केले. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकालही या सूत्रानुसारच जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षेचीही संधी…

विद्यार्थ्यांना या सूत्रानुसार जाहीर झालेला निकाल मान्य नसल्यास त्यांना परीक्षा देण्याचीही संधी मिळेल. करोना प्रादुर्भावाची स्थिती निवळल्यानंतर ही परीक्षा घेण्यात येईल, असे महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वारी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

’बारावीचा निकाल जाहीर करताना ३०: ३०: ४० असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांतील गुणांच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील.

’अकरावीच्या अंतिम परीक्षेच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. तर बारावीच्या वर्षात शाळांनी घेतलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, सत्र परीक्षा यांच्याआधारे ४० टक्के गुण देण्यात येणार आहेत.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tenth marks are also acceptable in the result cbse class 12 akp
First published on: 18-06-2021 at 01:26 IST