मुंबईच्या २०१४-३४ या काळातील विकास आराखडय़ाच्या सुधारित मसुद्याचे काम येत्या २१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी शनिवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले. यापूर्वी मसुद्यामध्ये राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणांची पाहणी करावी आणि मसुद्यात सुधारणा करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.
शहर नियोजनाच्या कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हा मसुदा आकारास येत आहे. मात्र मसुद्याची व्याप्ती लक्षात घेता हे काम २१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी असून त्यासाठी पालिकेला राज्य सरकारकडे मुदतवाढ मागावी लागणार आहे.
मुंबईच्या २०१४-३४ या काळातील विकास आराखडय़ाचा मसुदा तयार करून पालिकेने तो जनतेसाठी खुला केला होता. या मसुद्यामध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी पालिकेकडे सूचना आणि हरकतीच्या माध्यमातून केल्या होत्या. या त्रुटी दूर करून सुधारित विकास नियोजन आराखडय़ाचा मसुदा चार महिन्यांमध्ये सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते.  या कामाचा आढावा घेण्यासाठी पालिका विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्त आणि मसुद्याशी संबंधित अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक शनिवारी पालिका मुख्यालयात बोलावण्यात आली होत
रस्त्यांबाबत काळजी घ्यावी
विकास नियोजन आराखडय़ाचे काम सध्या पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या स्तरावर सुरू आहे. विभागातील प्रत्यक्ष ठिकाणांचा आढावा घेऊन मसुद्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. विभागातील रस्ते आणि नियोजित रस्त्यांबाबत काळजी बाळगण्यात यावी, असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
कामाचा अंदाज घेणार
राज्य सरकारने दिलेली चार महिन्यांची मुदत येत्या २१ ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. मुंबईची व्याप्ती, विकास नियोजन आराखडय़ाच्या मसुद्यातील त्रुटींची संख्या लक्षात घेता सुधारित मसुद्याचे काम २१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या कामासाठी पालिकेला आणखी काही दिवसांची मुदत राज्य सरकारकडे मागावी लागण्याची चिन्हे आहेत. परंतु तूर्तास २१ ऑगस्टपर्यंत किती काम पूर्ण होते याचा अंदाज घेऊन मुदतवाढीसाठी राज्य सरकारला पत्र पाठविण्यात येणार असल्याचे समजते.