राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून सावधतेचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रंगीबेरंगी कपडे घातलेले एखादे श्वान वा अन्य एखादा पाळीव प्राणी तुमच्या समोर आला तर हरखून जाऊ नका, सावध राहा.. शक्यतो त्याच्यापासून दूरच राहा.. तुम्हाला संशय येणार नाही परंतु त्या पाळीव प्राण्याच्या कपडय़ांत कदाचित स्फोटके लपवलेली असू शकतील आणि दूरनियंत्रकाच्या साह्य़ाने त्यांचा स्फोट घडवून आणण्यासाठी प्राण्याचे नियंत्रक कदाचित दूर कुठेतरी दबा धरून बसलेले असतील, तेव्हा सावधान.. हा इशारा दिला आहे, राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने!

प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर दहशतवादविरोधी पथकाने सर्वसामान्यांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. गेल्या वर्षभरात देशभरात झालेले दहशतवादी हल्ले, घातपाती कारवाया, सीमा भागातील तणाव, संशयास्पद रेल्वे अपघात, औरंगाबादेत सापडलेला शस्त्रसाठा, इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांविरोधात लागलेले खटल्यांचे निकाल या सर्व पाश्र्वभूमीवर राज्यात कधीही, कुठेही दहशतवादी हल्ले होऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद वस्तू, व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. परिसरात एखादे बेवारस वाहन अनेक दिवसांपासून उभे दिसल्यास पोलिसांना कळवावे. समाजमाध्यमांवरून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये व तसे संदेश इतरांना पाठवू नयेत. एखादा अपघात किंवा घातपात घडल्यास संयम बाळगून तपास यंत्रणांना सहकार्य करावे, अशा सूचना दहशतवादविरोधी पथकाने दिल्या आहेत.

सावधगिरी बाळगण्याच्या या सूचनांच्या यादीतच दहशतवादी हल्ले अथवा घातपाताच्या कारवाया घडवण्यासाठी पाळीव प्राण्यांचाही वापर केला जाऊ शकतो, असा इशारा दहशतवादविरोधी पथकाने दिला आहे. कपडे घातलेल्या पाळीव प्राण्यांपासून विशेष सावध राहण्याच्या सूचना पथकाने दिल्या असून सुरक्षा यंत्रणांकडून होणाऱ्या तपासकामात सहकार्य करण्याचे आवाहनही पथकाने केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादविरोधी पथकाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना पाळीव प्राण्यांबाबत सतर्क राहण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आगामी काळात कपडे घातलेल्या पाळीव प्राण्यांची शहरात झाडाझडती घेतली जाऊ शकते. प्रजासत्ताक दिन लक्षात घेता दहशतवादविरोधी पथकाने दहशतवादाशी संबंधित सर्व व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. संशयितांच्या चौकशीचे सत्रही राज्यभरात सुरू करण्यात आले आहे.

गुप्तहेर संघटनांसह खबऱ्यांकडून मिळणाऱ्या तसेच संशयितांच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीचा अभ्यास करून पाळीव प्राण्यांबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. – दहशतवादविरोधी पथकाचा एक अधिकारी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorist attacks from pets animals
First published on: 23-01-2017 at 01:02 IST