देहविक्रयासाठी भाग पाडणाऱ्या एका त्रिकुटाला जोरदार विरोध करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला त्या तिघांनी बेदम मारहाण करून तिच्या छातीवरही जखमा केल्याचा अघोरी प्रकार भिवंडीतील कुंभारखाणपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ मार्चला घडल्याचे उघड झाल्याने महिलांच्या असुरक्षिततेचे धोकादायक वळण पुन्हा उघड झाले आहे. कुंटणखाना चालविणाऱ्या रुबिना या ३४ वर्षीय महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली असून अजहर व अजमल हे तिचे दोन साथीदार मात्र फरारी झाले आहेत.
गुजरातमध्ये राहणाऱ्या या तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून या तिघांनी भिवंडीत आणले होते. प्रत्यक्षात तिला कुंटणखान्यात विकून या तिघांनी तिच्यावर देहविक्रयाची सक्ती सुरू केली. तिने ठाम नकार देताच, तिन्ही आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. यात तिचे बरेचसे दात तुटले आणि शरीरावर जखमाही खूप झाल्या. तेवढय़ावर न थांबून या तीनही नराधमांनी तिच्या छातीवरही जखमा केल्या.
या अमानुष प्रकाराने या तरुणीला तीव्र मानसिक धक्का बसला असून ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्यावर ठाण्याच्या नागरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुंटणखाना चालविणाऱ्या रुबिना हिला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.