उपवन आर्ट फेस्टिव्हलमध्ये तलावाकाठी उभारण्यात आलेले कलादालन हा महोत्सवाचा उत्कर्षबिंदू असून येथे कायमस्वरूपी कलाकेंद्र उभारावे, अशी इच्छा बहुतेक कलावंत आणि रसिक व्यक्त करीत आहेत.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच अनेक चित्ररसिकांची पावले कलादालनाकडे वळत होती. अकबर पदमसी, सुनील गावडे, प्राजक्ता पालव, विजयराज बोधनकर, अनंत जोशी, जोगन चौधरी, ज्योती भट, मेधा सप्ताळकर, काशिनाथ सोलवे, यशवंत देशमुख आदींच्या कलाकृती या आलिशान कला दालनात मांडण्यात आल्या असून मुंबई-ठाणे परिसरातील कलावंत तसेच रसिकांचा उपवनकाठच्या या दृश्यकला अविष्कारास खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: सुनील गावडेंची अभियांत्रिकी कला (चंद्राच्या विविध कला) रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. कला दालनातील एका छोटय़ा विभागात लघुपट प्रसारीत केले आहेत. कला दालनाच्या बाल्कनीतून थेट तळ्याचे दृश्य दिसत असून ठाणे शहराच्या कला दालनासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही, अशी भावना अनेक रसिक व्यक्त करीत आहेत.
महोत्सवातील दृश्यकला विभागाचे समन्वयक ज्येष्ठ चित्रकार सुधीर पटवर्धन आणि सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांनीही कायमस्वरूपी कला दालनासाठी उपवन तळ्याकाठची ही जागा अतिशय योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
महोत्सवातील दृश्यकलांचा हा अविष्कार केवळ कलादालनापुरता मर्यादित नाही. उपवनच्या संरक्षक भिंतीवरही ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांची हजारो चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
मुख्य व्यासपीठावर शुक्रवारी रात्री उस्ताद झाकीर हुसेन, यू. श्रीनिवास, बी. सेल्वा गणेश, राकेश चौरसिया आणि लिओनार्दो इटो या कलावंतांच्या वाद्याविष्कारानंतर शनिवारची पहाट रूपकुमार राठोड यांच्या सुफीगीतांनी उगवली. महोत्सवातील छोटय़ा व्यासपीठांवर दिवसभर सादर होत असलेल्या टॅलेंट हंट कार्यक्रमांनाही खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी हा महोत्सवाची सांगता होणार आहे.
अखेर ‘टीएमटी धावली
ठाण्यात भरणाऱ्या या सर्वात मोठय़ा कला महोत्सवाकडे पहिल्या दिवशी सपशेल पाठ फिरविणाऱ्या टीएमटीने अखेर शनिवारी जागे होत निळकंठ मार्गे उपवन परिसरासाठी काही फेऱ्या सोडण्यात सुरूवात करून सर्वसामान्य रसिकांना दिलासा दिला. मात्र महोत्सवात येणारे पर्यटक आणि रसिकांच्या तुलनेत या फेऱ्या कमीच होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2014 रोजी प्रकाशित
उपवनकाठीच दृश्यकलेचे अखंड दर्शन घडावे !
उपवन आर्ट फेस्टिव्हलमध्ये तलावाकाठी उभारण्यात आलेले कलादालन हा महोत्सवाचा उत्कर्षबिंदू असून येथे कायमस्वरूपी कलाकेंद्र उभारावे,

First published on: 12-01-2014 at 05:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane upvan art festival