१३२ अभियंत्यांना गुपचूप बढती; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई : मुंबई महापालिके तील १३२ अभियंत्यांना बढती देण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थापत्य समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र सदस्यांना अंधारात ठेवून घाईघाईने सत्ताधारी पक्षाने याबाबतचा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप काँग्रेसने के ला आहे. या अभियंत्याच्या बढतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोपही काँग्रेसने के ला आहे. येत्या सोमवारी याबाबतचा प्रस्ताव सभागृहात येणार असून त्यावरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिके तील १३२ अभियंत्यांना बढती देण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच स्थापत्य समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव सभेच्या तीन दिवस आधी न पाठवता सभेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी हा प्रस्ताव सदस्यांच्या घरी पाठवण्यात आला. तसेच दृक्-श्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीत कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी के ला आहे. १३२ अभियंत्यांपैकी १०५ साहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदी बढती देण्यात आली आहे, तर २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदी बढती देण्यात आली आहे. अभियंत्यांना बढती देण्यास आमचा विरोध नाही, पण ज्या पद्धतीने हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले त्याचा आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया रवी राजा यांनी व्यक्त के ली आहे.

दरम्यान, स्थापत्य समितीमध्ये काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू हे सदस्य असून आपल्याला दृक्-श्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीची लिंक उशिरा देण्यात आल्याचा आरोप त्यांनी के ला आहे. बैठक सुरू झाल्यानंतर तासाभराने लिंक मिळाली व तोपर्यंत विषय मंजूर करण्यात आला होता, असाही आरोप वणू यांनी के ला आहे. त्यामुळे हे विषय पुन्हा स्थापत्य समितीच्या पटलावर चर्चेसाठी आणावे, अशी मागणी वणू यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना केली आहे.

गुन्हे, भ्रष्टाचाराच्या आरोपांची माहिती नाही

ज्या १३२ अभियंत्यांना बढती देण्यात आली आहे त्यांची नावे प्रस्तावात असली तरी त्यापैकी कोणावर गुन्हे आहेत का, कोणते भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का याबाबत कोणतीही माहिती प्रस्तावात दिलेली नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच काही अभियंत्यांना डावलून ही बढती देण्यात आल्याचा आरोप अभियंते करीत आहेत. त्यामुळे या बढत्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता व्यक्त के ली जात आहे. येत्या सोमवारी हा विषय पालिका सभागृहाच्या पटलावर मांडण्यात येणार असून या वेळी महापौरांनी या प्रकरणी लक्ष घालून अभियंत्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The issue of promotion of engineers will simmer ssh
First published on: 24-07-2021 at 00:52 IST