मुंबईत मोठय़ा संख्येने अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या मोबाइल टॉवरना वेसण घालण्यासाठी महापालिकेने नवे धोरण निश्चित केले आहे. या धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर  एका इमारतीवर केवळ एकच टॉवर उभारता येणार आहे. त्याचबरोबर रुग्णालय, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारता येणार नाहीत. मंजुरीसाठी हे धोरण सुधार समितीच्या येत्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. बक्कळ पैसे देण्याचे आमिष दाखवून अनेक कंपन्यांनी इमारतींवर एकाहून अधिक मोबाइल टॉवर उभारले आहेत. यापैकी बहुसंख्य मोबाइल टॉवर अनधिकृत असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आता पालिकेने मोबाइल टॉवरबाबत धोरण तयार केले असून त्याला राज्य सरकारनेही हिरवा कंदिल दाखविला आहे.