भूमिगत कचरापेट्यांचा प्रकल्प ‘मातीत’

महापालिकेने मोठा गाजावाजा करून मुंबईत चार ठिकाणी भूमिगत कचरापेट्या बसवल्या. 

जागा मिळत नसल्याने योजना गुंडाळणार; सव्वाचार कोटींच्या खर्चावर पाणी

मुंबई : कचरापेट्यांमधून ओसंडून वाहणारा कचरा, त्यातून येणारा उग्र वास यातून मुंबईकरांची सुटका व्हावी म्हणून पालिका प्रशासनाने भूमिगत कचरापेट्यांचा तोडगा काढला होता. पण जागा मिळत नसल्यामुळे हा प्रयोग तीन वर्षांनंतरही अयशस्वी ठरला आहे. मुंबईत २० ठिकाणी भूमिगत कचरापेट्या बसवण्याचे पालिकेने ठरवले होते व त्याकरिता जागाही शोधण्यात येत होत्या. सव्वाचार कोटी रुपये खर्चून या पेट्या बसवण्यात येणार होत्या. मात्र त्यापैकी मोजक्या सहा, सात ठिकाणीच या पेट्या बसविण्यात आल्या आहेत.

महापालिकेने मोठा गाजावाजा करून मुंबईत चार ठिकाणी भूमिगत कचरापेट्या बसवल्या.  दक्षिण मुंबईत दोन ठिकाणी तर मालाड आणि कांदिवलीत दोन ठिकाणी भूमिगत पेट्या बसवण्यात आल्या होत्या. त्यापैकी  दोन पेट्या गिरगाव चौपाटीजवळ बसवल्या होत्या. या पेट्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर घन कचरा विभागाने  प्रत्येक वॉर्डात दोन याप्रमाणे आणखी २० ठिकाणी अशा भूमिगत कचरापेट्या बसवण्याचे ठरवले होते.  अन्य वॉर्डामध्ये भूमिगत पेट्यांसाठी जागा निश्चित करण्याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आले होते.  पण या पेट्यांसाठी जागाच उरलेली नाही.  मुंबईत सर्वत्र उपयोगिता वाहिन्यांचे (केबल्स) जाळे पसरलेले असल्यामुळे या अवघ्या दोन घनमीटरच्या कचरापेट्यांसाठी जागा मिळणे मुश्कील झाले होते. त्यामुळे संपूर्ण मुंबईचा हा प्रयोग रखडला होता. मात्र तरीही २० ठिकाणी या भूमिगत पेट्या बसवण्यासाठी ओला व सुका कचऱ्याच्या अशा एकूण ४० पेट्या खरेदी करण्यात येणार होत्या. सप्टेंबर २०१९ मध्ये  स्थायी समितीने  ४० पेट्यांचा प्रस्ताव मंजूर केला होता. या चाळीस पेट्यांकरिता चार कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार होते.

मात्र गेल्या दोन- अडीच वर्षात हे काम पूर्ण झालेले नाही. जागा मिळणे कठीण असतानाही या पेट्या बसवण्याचे पालिकेने ठरवले होते. मात्र त्यानंतर मार्चपासून टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे हा प्रकल्प बारगळला. नंतरच्या काळात केवळ सहा, सात ठिकाणी या पेट्या बसवण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.  पावसाळ्यामुळे जमीन खोदण्यास परवानगी नसल्यामुळे हे काम रखडले असून आता त्याला सुरुवात होईल असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. जागा मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. मात्र आम्ही लवकरच काहीतरी तोडगा काढू, असे घनकचरा विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी सांगितले.

उपयोगिता वाहिन्यांचा अडथळा

 जमिनीखाली मोठ्या प्रमाणावर विविध कंपन्यांच्या उपयोगिता वाहिन्यांचे जाळे असल्यामुळे कुठेही रस्त्याच्या कडेला या पेट्यांसाठी जागा मिळणे मुश्कील झाले आहे. विविध वीज कंपन्यांच्या वाहिन्या, दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांच्या वाहिन्या अशा तब्बल ३० उपयोगिता वाहिन्या जमिनीखालून जात असून त्यामुळे आता पालिकेला या भूमिगतपेट्यांसाठी जागाच मिळेनाशी झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The plan will be scrapped due to lack of space garbage bin project akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या