जागोजागी छताला लावलेले टेकू..प्लास्टर कधी निघेल याचा पत्ता नाही..पावसाळ्यात होत असलेली गळती..अशी भयावह अवस्था आहे महापालिकेच्या शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागाची. येथील वॉर्ड क्रमांक ३२ मध्ये हृदयविकाराचे रुग्ण जागोजागी छताला लावलेल्या टेकूंकडे पाहत छत कोसळणार तर नाही ना या भीतीच्या छायेत उपचार घेत आहेत. ही परिस्थिती केवळ रुग्णांचीच नाही तर डॉक्टरांच्या खोलीतही छताला टेकू लावलेले दिसतात. गेल्या वर्षी पावसाळ्यात छताचे प्लास्टर पडल्यानंतर येथील हृदयविकार विभागाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असली तरी तसूभरही काम पुढे सरकलेले दिसत नाही. महापालिकेचा हा ‘गतिमान’ कारभार रुग्णांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून पालिकेतील भाजपचे रखवालदारही झोपलेलचे आहेत.

महापालिकेच्या शीव रुग्णालयातील अपघात विभागाच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी पालिकेने हाती घेतले. यासाठी कोटय़वधी रुपयांची निविदा काढून कंत्राटदारांना कामही देण्यात आले. या कामाची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाकडे न सोपवता त्यासाठी पालिका मुख्यालयातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली हे काम ‘रुग्णालय पायाभूत सुविधा विभागा’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांत हे काम संथगतीने सुरू असून याचा फटका अपघात विभाग, बालशल्य, मेडिकल इमर्जन्सी, युरॉलॉजी, रक्तपेढी तसेच हृदयविकार विभागाला बसला आहे.

गेल्या वर्षी हृदयविकार विभागाचा अतिदक्षता विभाग तसेच कॅथलॅबसह ईसीजी विभागाची जागा दुरुस्ती व नूतनीकरणासाठी मोकळी करून देण्यात आली व अतिदक्षता विभाग त्याच मजल्यावरील युरॉलॉजी विभागात हलविण्यात आला. या विभागात पाच कोटी रुपयांची नवीन कॅथलॅब बसविण्यात येणार असून तेथील छताचे काम करण्यात आलेले नाही. वर्षभरात कॅथलॅब बसविण्याच्या कामात फारशी प्रगती झाली नसून वॉर्ड ३२ मधील छताच्या एका भागाचे प्लास्टर गेल्या वर्षी पडले होते. त्यानंतरही या विभागात आज जागोजागी केवळ टेकू लावून ठेवले आहेत. हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. नाथानी यांनी विभागाचे काम वेगाने करण्यासाठी अधिष्ठाते डॉ. सुलेमान र्मचट यांना अनेक पत्रे पाठवली आहेत तर डॉ. र्मचट हेही हॉस्पिटल पायाभूत सुविधा विभागाकडे सातत्याने पाठपुरवा करत असले तरी या कामाची जबाबदारी असलेल्या उपायुक्त व अभियंत्यांना काहीही सोयरसुतक असल्याचे दिसून येत नाही. डॉ. र्मचट यांना याबाबत विचारले असता आम्ही कामासाठी पाठपुरावा करत आहोत असे त्यांनी सांगितले. ही अपघात विभागाची इमारत सत्तरच्या दशकातील असून कंत्राटदार व पालिके च्या सुस्त कारभाराचा फटका रुरुग्णांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे.

भाजपचे झोपाळू रखवालदार आणि करून दाखवले

महापालिका निवडणुकीत करून दाखवल्याच्या बऱ्याच घोषणा शिवसेनेने केल्या. प्रत्यक्षात पालिका रुग्णालयांत पुरेशा परिचारिका, कर्मचारी तसेच औषधे नसणे याची दखल घेण्यास कोणी तयार नाही. शीव रुग्णालयातील अपघात विभागाची जुनी इमारत धोकादायक बनली असून कंत्राटदार वेळेवर काम करत नाही आणि अभियंते थंड बसून आहेत. गंभीर बाब म्हणजे पालिका रखवालदार म्हणून काम करण्याच्या बढाया मारणारी भाजप केवळ स्थायी समितीतच ‘अर्थपूर्ण’ रखवालदारी करताना दिसते. रुग्णालयांच्या दुरवस्थेशी या रखवालदारांना काहीही घेणेदेणे नसल्याचे दिसते, असा आक्षेप डॉक्टरांकडून घेतला जात आहे.

  • शीव रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात बाह्य़ रुग्णविभागात रोज सुमारे तीनशे रुग्ण येत असतात.
  • वर्षांकाठी येथे सुमारे सुमारे साडेतीन हजार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसह हृदयविकारावर वेगवेगळे उपचार केले जातात.
  • अतिदक्षता विभागात १४ खाटा तर हृदयविकाराच्या वॉर्ड ३२ मध्ये २८ खाटा असून बहुतेकवेळा मोठय़ा संख्येने रुग्ण येत असल्यामुळे रुग्णांना जमिनीवर गादी घालून झोपावे लागते.