युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीसह देशातील सुरक्षेसंबंधी मोहिमांमध्ये शहीद किंवा जखमी झालेल्या महाराष्ट्रातील अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक मदतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शहीद जवानाच्या अवलंबितांना २५ लाखांऐवजी एक कोटींची मदत देण्यात येणार आहे. तर जखमी जवानांनाही २० ते ६० लाखांपर्यंत मदत केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशांतर्गत सुरक्षेसंबंधी मोहिमेदरम्यान प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या तसेच सीमा सुरक्षा बल व इतर निमलष्कर दलातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून एकरकमी आर्थिक मदत केली जाते. देशाबाहेरील मोहिमेत शहीद अथवा अपंगत्व आलेल्या जवानांनाही ही मदत दिली जाते. १९९९ मध्ये दोन लाख असलेल्या अनुदानात त्यानंतरच्या शासन निर्णयानुसार वेळोवेळी वाढ करण्यात आली होती. सध्या २७ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार शहिदांच्या कुटुंबीयांना २५ लाख इतकी आर्थिक मदत एकरकमी अनुदान म्हणून देण्यात येत होती. तसेच अपंगत्व आलेल्या जवानांना अपंगत्वाचे प्रमाण १ टक्का ते २५ टक्के असल्यास ५ लाख, २६ टक्के ते ५० टक्के असल्यास ८.५० लाख तर ५१ टक्के ते १०० टक्के असल्यास १५ लाख रुपये देण्यात येत होते.

मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार १ जनेवारी २०१९ पासून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या या एकरकमी अनुदानाची रक्कम एक कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या राज्यातील जवानांना १ टक्के ते २५ टक्के अपंगत्व आल्यास २० लाख, २६ टक्के ते ५० टक्के अपंगत्व आल्यास ३४ लाख व अपंगत्वाचे प्रमाण ५१ टक्के ते १०० टक्के असल्यास ६० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a big increase in the financial help of solider msr
First published on: 16-07-2019 at 18:49 IST