मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या म्हणजे महायुतीच्या विरोधात लढण्यास राज्यात सक्षम विरोधी पक्षच नव्हता. काँग्रेसमध्ये तर लढण्याचा अजिबात दम नव्हता. अशा वेळी काही अराजकतावादी संघटनांना पुढे करून विरोधक निवडणूक लढले. आम्हाला राजकीय पक्षांच्या विरोधात लढण्याचा चांगला अनुभव आहे. पण अशा अराजकतावादी संघटनांबरोबर आम्ही कधीच लढलो नव्हतो, असे परखड मतप्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात बोलताना केले.
कोणत्याही निवडणुकीत विरोधकांचे स्वागतच असते. निवडणुकीतील लढाई ही दोन किंवा अधिक राजकीय पक्षांमध्ये असते. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील लढाई महायुती विरोधी अराजकतावादी संघटनांमध्ये झाली. खरे तर तेव्हा आमच्या विरोधात लढण्यासाठी कोणताही सक्षम राजकीय पक्ष नव्हता. काँग्रेस, शिवसेना वा राष्ट्रवादी कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात लढण्याची आमची तयारी असते. पण तेव्हा विरोधकांचे कुठेही अस्तित्व दिसत नव्हते. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या संघटनांना पुढे करण्यात आले.
यातील काही संघटनांवर डॉ. मनमोहन सिंग सरकारने बंदी घातली होती. अशा अराजकतावादी संघटनांशी लढण्याचा आम्हाला अजिबात अनुभव नव्हता. यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशा अराजकतावादी संघटनांच्या विरोधात लढण्याचे आवाहन मी राष्ट्रीय विचारांच्या संघटनांना केले होते. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघही होता. राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी अराजकतावादी संघटनांच्या प्रचाराला सडेतोड उत्तर दिले. त्याचा फायदा असा झाला की, विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी यश मिळाले, असे फडणवीस यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा प्रकार झाला होता. अल्पसंख्याकबहुल भागात झालेले मतदान हे त्याचे उदाहरण होते. राज्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकारही मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. सुरुवातीला मलाही हा अतिरंजीत प्रकार वाटला होता. मी जेव्हा त्याच्या खोलात गेलो तेव्हा हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आले. हिंदू मुलींशी लग्न करून मुले झाल्यावर त्यांना सोडून दिल्याची अनेक उदाहरणे असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
समाज माध्यमातून व्यक्त झाल्याबद्दल पुण्यात शिक्षणासाठी असलेल्या काश्मिरी मुलीच्या अटकेवरून न्यायालयाने राज्य शासनाची कानउघाडणी केल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता फडणवीस यांनी मुलीच्या अटकेचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना लष्कराच्या विरोधीत मतप्रदर्शन केल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना उमटणे स्वाभाविक होते. त्यामुळे पोलिसांनी या मुलीला अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशाचे सरकारकडून पालन केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शरद पवारांचे कौतुकच
निवडणुकीत जय, पराजय होऊ दे, शरद पवार हे कधीच खचून जात नाहीत. सतत काम करीत असतात. सतत कार्यरत राहण्याच्या त्यांच्या या गुणाचे कौतुकच करायला हवे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्र्यांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा अनुभव, पृथ्वीराज चव्हाणांचा अभ्यासूपणा आणि प्रश्न समजून त्याची सोडवणूक करणे, नारायण राणे यांचा प्रशासनावर असलेला वचक हे महत्त्वाचे आहे.
एकनाथ शिंदे- अजित पवार संवाद साधण्यात कमी
एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री संवाद साधण्यात कमी पडतात, अशी कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दोघांनी मला माफ करावे, पण दोघेही संवाद साधणारे नेते नाहीत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे हे नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे की अजित पवार कोण वरचढ ठरेल या प्रश्नावर, भाजप असे उत्तर देत फडणवीस यांनी गुगली टाकली.