जंगलाच्या संरक्षणासाठी नागरिकांची वनविभागाला मदत

नमिता धुरी
मुंबई : टेकडय़ांवर लागलेली आग असो वा जंगलातील संशयास्पद हालचाली; त्या दिसताक्षणी यंत्रणांना सावध करणारे हजारो डोळे सध्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’वर टेहळणी करत आहेत. उद्यानाच्या भोवताली असणाऱ्या उंच इमारतींमध्ये राहणारे निसर्गप्रेमी नागरिक जंगलाच्या संरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून वनविभागाला मदत करत आहेत. राष्ट्रीय उद्यानाच्या या शेजाऱ्यांचे ‘वॉरियर्स फॉर एसजीएनपी’ नावाने व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आले आहेत.

अनेकदा राष्ट्रीय उद्यानामध्ये सुक्या पाचोळ्यामुळे लहान-मोठी आग लागते. वनविभागाला त्याची माहिती मिळून कर्मचारी तेथे पोहोचेपर्यंत हा आगीचे वणव्यात रूपांतर होते. यामुळे जंगलातील वनसंपदेचे नुकसान होते. तसेच उद्यानात अनधिकृतपणे प्रवेश करून शिकार किंवा जंगलाला हानीकारक ठरतील अशी कृत्ये काही जण करतात. चहुबाजूंना पसरलेले भलेमोठे जंगल वाचवण्यासाठी वनविभागाला तारेवरची कसरत करावी लागते. हे सर्व टाळण्यासाठी जंगलाच्या संरक्षणकार्यात नागरिकांना सहभागी करून घेतले जात आहे.

आपल्या खिडकीतून दिसणाऱ्या जंगलाचे छायाचित्र काढून नागरिक वनविभागाला पाठवतात. यावरून नेमक्या कोणत्या भागावर हे नागरिक लक्ष ठेवू शकतात याची कल्पना विभागाला येते. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे समूह तयार करण्यात आले आहेत. हे समूह अनुक्रमे घोडबंदर, गोरेगाव चित्रनगरी, ठाणे, गोरेगाव ते वसई या भागांतून दिसणाऱ्या जंगलावर लक्ष ठेवतात. एखाद्या ठिकाणी आग किं वा संशयास्पद हालचाल दिसल्यास ‘गूगल लोके शन’ दिसेल अशा पद्धतीने छायाचित्र काढून ते समूहावर पाठवले जाते. त्यानंतर समूहाचा समन्वयक अधिक माहिती घेऊन मुख्य समन्वयकाला कळवतो.

येऊर, बोरिवली व तुळशी अशा तीन रेंज उद्यानात आहेत. मुख्य समन्वयकाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित रेंजला त्याची माहिती दिली जाते आणि काहीच मिनिटांत यंत्रणा कामाला लागतात. अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी पाटलीपाडा टेकडीवरील आग विझवण्यात आल्याची माहिती या समूहाचे सदस्य नितेश पंचोली यांनी दिली. ‘हे समूह २४ तास कार्यरत असतात. रात्री-अपरात्री कधीही तक्रारी प्राप्त होतात. या समूहातील संदेशांसाठी प्रत्येकाने रिंगटोनही वेगळी ठेवली आहे. टाळेबंदीत हा उपक्रम सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरात शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत,’ असे मानद वन्यजीव रक्षक मयूर कामथ यांनी सांगितले.