‘संस्कृती कलादर्पण’चा तीन दिवसीय नाटय़ महोत्सव नुकताच माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलात पार पडला. या सोहळ्यात एकूण पाच नाटकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस आहे. ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’, ‘ऑल दि बेस्ट २’, ‘परफेक्ट मिसमॅच’ आणि ‘दोन स्पेशल’ ही पाच नाटके अंतिम फेरीत दाखल झाली आहेत.
१६ व्या ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ नाटय़ महोत्सवाचे उद्घाटन ‘अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलना’चे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या नाटय़ महोत्सवाची सुरुवात देवेंद्र पेम दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट २’ या नाटकाने करण्यात आली. त्यानंतर अन्य नाटके सादर झाली. अभिनेत्री, निर्माती अर्चना नेवरेकर आणि चंद्रकांत सांडवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ नाटय़ महोत्सवाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
चित्रपट सोहळ्याचीही घोषणा
‘संस्कृती कलादर्पण’च्या चित्रपट महोत्सवाची घोषणाही या वेळी करण्यात आली. ६ आणि ७ एप्रिल रोजी प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिर येथे हा चित्रपट महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवासाठी एकूण ६४ चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ‘नटसम्राट’, ‘ख्वाडा’, ‘हलाल’, ‘मितवा’, ‘देऊळबंद’, ‘रंग पतंगा’, ‘कोती’, ‘संदूक’, ‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या पाच चित्रपटांची महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण महोत्सवातून जमलेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार असल्याचेही या वेळी जाहीर करण्यात आले.