शैलजा तिवले, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोना रुग्णआलेख घसरताच नियम पालनाबाबत बेफिकीरीचे चित्र सर्वत्र दिसत असून, मुंबईत लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. मुंबईत दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटूनही सुमारे तीन लाखांहून अधिक नागरिकांनी ही लस घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईत सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २९ लाख ५१ हजार लसीकरण झाले होते. या महिन्यात रोज सरासरी एक लाख नागरिकांना लस देण्यात येत होती. परंतु, ऑक्टोबरमध्ये लसीकरणाचा आलेख उतरणीला लागला. चालू महिन्यात सुरूवातीला सरासरी ६० हजार नागरिकांचे लसीकरण होत होते. गेल्या काही दिवसांत त्यात आणखी घट झाली असून, दैनंदिन लसीकरणाची आकडेवारी ५० हजारांपर्यंत घसरली आहे. २५ ऑक्टोबपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईत या महिन्यात १५ लाख ६६ हजार २८२ लसीकरण झाले, असून सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये सुमारे ४७ टक्क्यांनी घट झाली आहे.

मुंबईत ९७ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा आणि ५५ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. सुमारे तीन लाख नागरिकांनी दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटूनही लस घेतलेली नाही. ८४ दिवसांनंतर (कोव्हिशिल्ड) अनेक जण दुसरी मात्रा घेण्याचे विसरून जातात. सणासुदीच्या काळात लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद घटला आहे. काही जण एक मात्रा घेऊन मुंबईबाहेर गेले असून, ते दिवाळीनंतर परतण्याची शक्यता आहे. त्यामुळेही लसीकरण कमी होत असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

शहरातील      लसीकरणाची आकडेवारी

जून          २१ लाख ५९ हजार ६९०

जुलै          १७ लाख ८८ हजार १२२

ऑगस्ट       २१ लाख ३६ हजार ५३१

सप्टेंबर       २९ लाख ५१ हजार १५७

ऑक्टोबर             १५ लाख ६६ हजार २८२

 (२५ पर्यंत)

शिबिरांवर भर..

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विविध विभागांमध्ये ठिकठिकाणी शिबिरे भरविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. किती नागरिकांची दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली याची माहिती ‘कोविन’ प्रणालीवर आहे. परंतु, या नागरिकांचा ठावठिकाणा कळत नाही. त्यामुळे दुसरी मात्रा न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेणे शक्य नाही. ‘कोविन’मधून त्यांचा संपर्क क्रमांक किंवा निवासाचा पत्ता मिळाल्यास संबंधित विभागीय करोना नियंत्रण कक्षाद्वारे त्यांचा शोध घेणे सोपे होईल, असेही काकाणी म्हणाले.

आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लसीकरणाला मिळणारा प्रतिसादही घटतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे लसीकरण वाढविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लससाक्षरता निर्माण करणे गरजेचे आहे.      

– डॉ. शशांक जोशी, करोना कृती दलाचे सदस्य 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three lakh people in mumbai ignore to take vaccine second dose zws
First published on: 27-10-2021 at 02:49 IST