मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने कांदिवली शताब्दी रुग्णालय, कुपर आणि जोगेश्वरी येथील अजगावकर रुग्णालयांना अत्याधुनिक स्वरुप देतानाच या रुग्णलयांमध्ये तब्बल ७१३ खाटा वाढविल्या आहेत. यासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च झाला असून येत्या १५ जुलै रोजी जुहू-विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यापाठोपाठ १५ ऑगस्ट रोजी कांदिवली शताब्दी आणि १५ सप्टेंबर रोजी जोगेश्वरी येथील आजगावकर रुग्णालय सुरु होणार आहे. या रुग्णालयांत खाजगी व सार्वजनिक सहभागातून एमआरआय व सिटी स्कॅनची व्यवस्था पालिकेच्याच दराने सुरु होत असून मध्यमवर्गाला परवडू शकेल अशी ‘पेड बेड’ची संकल्पनाही राबविण्यात येणार आहे.
केंद्र वा राज्य सरकारने फुटकी कवडीही मुंबईच्या आरोग्यासाठी दिलेली नाही. अशावेळी मुंबईच्या आरोग्याचे शिवधनुष्य महापालिकेने उचलले असून उपनगरातील ९३ लाख लोकसंख्येचा विचार करून एकीकडे रुग्णालयांचे सक्षमीकरण करतानाच खाटा वाढविल्या आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर म्हणाल्या, कुपर रुग्णालयाची सध्याची क्षमता ५२० खाटांची असून ६० खाटा वाढविण्यात येणार आहेत. कांदिवली शताब्दी रुग्णालय हे तीनशे खाटांचे तर जोगेश्वरी येथील आजगावकर रुग्णालय हे २६६ खाटांचे राहील. यासाठी आवश्यक पदे भरून नियोजित वेळेतच ही रुग्णालये सुरु करण्यात येतील. या रुग्णालयांत ना नफा ना तोटा दरांनुसार एमआरआय व सिटी स्कॅन चाचणीची सेवा उपलब्ध होणार आहे. अनेक लोकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसते मात्र पालिका रुग्णालयात सामायिक स्वच्छतागृह व वॉर्डमुळे ते उपचारासाठी येत नाहीत. त्यामुळे नव्याने उभ्या राहणाऱ्या सर्व रुग्णालयांत यापुढे स्वतंत्र व्यवस्था असलेले ‘पेड बेड’ निर्माण करण्यात येणार असून त्यांचे प्रमाण एकूण क्षमतेच्या दहा टक्के राहील, असे मनिषा म्हैसकर यांनी सांगितले. सध्या पूर्व व पश्चिम उपनगरातील पलिका रुग्णालयांमध्ये ३७८६ खाटा असून आगामी वर्षांत त्यात १०४७ खाटांची वाढ करण्यात येणार आहे.