दक्षिण मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वे यांच्या पुढे पश्चिम रेल्वे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे तिकिटे मिळवण्यासाठी सामान्य प्रवाशांची धडपड नेहमीची असली, तरी तिकीट दलाल मात्र नेहमीच तिकीट मिळवण्यात पुढे असतात. मात्र या दलालांना आळा घालण्यात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने आघाडी घेतली असून देशभरातील इतर रेल्वे सुरक्षा दल विभागांच्या तुलनेत पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाने सर्वाधिक दलालांवर कारवाई केली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये तिकीट दलालांची संख्या प्रचंड असून मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस किंवा मध्य रेल्वेच्या मुख्य टर्मिनसवरून जाणाऱ्या गाडय़ांच्या आरक्षणांची दलाली येथून केली जाते. यंदा एप्रिलपर्यंत या मार्गावर १६७ प्रकरणांची नोंद झाली असून त्याखालोखाल दक्षिण मध्य रेल्वेवर ४९ आणि उत्तर रेल्वेवर ३७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशांनुसार देशभरातील रेल्वे सुरक्षा दलांनी आपापल्या भागांमधील तिकीट दलालांवर कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने हाती आलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल दलालांवरील कारवाईत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ पश्चिम उपनगरांमध्ये दलालांची संख्या जास्त आहे. यात सर्वाधिक दलाल अंधेरी आणि वांद्रे या परिसरात पकडले गेले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता सातत्याने पश्चिम रेल्वेवरील तिकीट दलालांवर झालेल्या कारवाईची संख्या आणि प्रकरणे सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

पश्चिम उपनगरांमध्ये तिकीट दलालांची संख्या जास्त आहे, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. पण इतर विभागांच्या तुलनेत पश्चिम रेल्वेचा रेल्वे सुरक्षा दल विभाग दलालांवरील कारवायांच्या बाबतीत अधिक कठोर आहे. १६ जून ते २९ जून २०१६ या काळात तिकीट दलालांविरोधात राबवलेल्या मोहिमेतही पश्चिम रेल्वेवर सर्वाधिक म्हणजे ४९ प्रकरणांची नोंद झाली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवरील तिकीट दलाल वाढले

२०१४मध्ये देशभरात तिकीट दलालीची एकूण २८१ प्रकरणे नोंदवली गेली होती. या २८१ प्रकरणांत ३३७ जणांना अटक झाली होती. या २८१ पैकी १५६ प्रकरणे एकटय़ा पश्चिम रेल्वेवर नोंदवण्यात आली असून त्यात १७२ जणांना अटक झाली होती. त्याखालोखाल दक्षिण मध्य रेल्वेवर त्या वर्षांत ५९ प्रकरणांमध्ये ६० जणांना पकडण्यात आले. उत्तर रेल्वेवर ३९ प्रकरणांमध्ये ४२ जण आणि मध्य रेल्वेवर १७ प्रकरणांमध्ये ४८ अशी अटक झाली होती. २०१५मध्ये पश्चिम रेल्वेवर ३०० प्रकरणांमध्ये ३७० जणांवर कारवाई झाली. या वर्षांत दक्षिण मध्य रेल्वेवर १७७ प्रकरणांमध्ये १८१ जणांना ताब्यात घेण्यात आले. ही संख्या उत्तर रेल्वेवर १७५ प्रकरणांत २१९ आणि मध्य रेल्वेवर ३९ प्रकरणांमध्ये ५३ एवढी होती. या वर्षी संपूर्ण देशात ८१६ प्रकरणांमध्ये ९९२ जणांना तिकीट दलाली करताना अटक करण्यात आली. यंदाच्या वर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशांनुसार एप्रिल महिन्यापर्यंत पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाने १६७ प्रकरणांमध्ये १९८ जणांना पकडले होते. दक्षिण मध्य रेल्वेवर ४९ प्रकरणांमध्ये ५४, उत्तर रेल्वेवर ३७ प्रकरणांमध्ये ३७ आणि मध्य रेल्वेवर २५ प्रकरणांमध्ये २६ जणांना अटक करण्यात आली. एप्रिल महिन्यापर्यंत ३६२ प्रकरणांमध्ये ४२३ जणांवर कारवाई झाली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ticket brokers issue in western railway
First published on: 01-07-2016 at 05:06 IST