या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या काळात ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता; प्रवासी संख्येत वाढ

उत्पन्न वाढवण्याची खटपट करणाऱ्या बेस्टने प्रवासी भाडे टप्प्यात सुसूत्रीकरण आणि वातानुकूलित बस गाडय़ांचा प्रवास स्वस्त केल्याने प्रवाशांनी बेस्टला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. १ ते ५ जुलै या पाच दिवसांची तुलना जूनच्या शेवटच्या आठवडय़ातील २४ ते २८ या दिवसांशी केली असता, बेस्टचे उत्पन्न तब्बल ३७ लाख ७ हजारांनी वाढल्याचे बेस्टच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यामुळे कोटय़ावधीं रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या बेस्टला येणाऱ्या काळात ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातत्याने प्रवासी संख्या आणि उत्पन्न घसरत असल्याने बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासनाने वातानुकूलित बस गाडय़ांचा स्वस्त प्रवास आणि प्रवास भाडय़ाच्या टप्प्यात सुसूत्रीकरण १ जुलैपासून मुंबईकरांना दिलासा दिला. यामुळे बेस्टला फटका बसण्याची शक्यता होती. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात बेस्टच्या तिजोरीत १६ कोटी ३९ लाख ६६ हजार ६६२ रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे.

गेल्याच वर्षी बेस्टची आर्थिकस्थिती सुधारावी यासाठी एकाच वर्षांत दोनदा भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली. दोन वर्षांपूर्वी ३५ लाखांवर असणारी बेस्टची प्रवासी संख्या २८ लाखांवर घसरली. त्यामुळे तिकीट दर वाढवून काहीच लाभ होत नसल्याने बेस्टच्या भाडेसूत्रात बदल करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आला. यात प्रवास भाडेटप्प्यात नव्याने ८, १२, १७, २५, ३५, ४५ या टप्प्याचा समावेश करण्यात आला. याशिवाय वातानुकूलित गाडय़ांचे तिकीट दरांसह मासिकपासही स्वस्त करण्यात आले. याला बेस्ट समिती, महापलिका आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने मंजुरी दिली. त्यामुळे १ जुलैपासून मुंबईकरांचा प्रवास स्वस्त झाला.

७७ लाखांची रोकड प्रवासी विसरले!

गेल्या पाच वर्षांत बेस्टच्या प्रवासात तब्बल ७७ लाख ९५ हजार ८५९ रुपये विसरल्याची नोंद झाली आहे. २०११ ते २०१६ या वर्षांत बेस्ट बस गाडीत दरवर्षी सरासरी १५ लाखांची रोकड प्रवासी विसरत असल्याचे सांगितले जात आहे. रोकड विसरण्यात महिला प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ticket price reduction by best bus
First published on: 08-07-2016 at 04:04 IST