काय, डास मारतो आहेस का.. रिकामटेकडय़ा माणसाला हा प्रश्न कुत्सितपणे विचारला जात असला तरी महानगरपालिकेने मात्र या कामासाठी वेतन देऊन दहा जणांची नेमणूक केली आहे. ‘कीटक संकलक’ या पदावर काम करत असलेले हे दहा कर्मचारी पूर्ण वर्षभर शहरातील जिवंत डास व अळ्या पकडून प्रयोगशाळेत पोहोचवण्याचे काम करतात. डासांवाटे पसरणारे आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांची चर्चा होत असली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत महत्त्वाचे काम बजावणारे हे कीटक संकलक मात्र कोणाच्या खिजगणतीत नाहीत.
रबरी नलिका जोडलेली काचेची लांब नळी, लहान परीक्षा नळी (टेस्ट टय़ूब) आणि टॉर्च एवढे शस्त्रसाहित्य घेऊन कीटक संकलक तयार असतो. नेमून दिलेल्या जागी रोज सकाळपासून त्यांची भटकंती सुरू होते ती डासांच्या शोधात. भिंतीवर, अडगळीच्या ठिकाणी डास बसलेला दिसला, की ते सावध होतात. त्याच्याकडील काचेच्या लांब नळीचे टोक डासाच्या जवळ सुगावा न लागता नेले जाते. या नळीला जोडलेल्या रबरी नलिकेतून तोंडाने हवा आत ओढली की त्यासोबत डास नळीत येतो. मग चटकन नळीवर बोट ठेवून तो उडू न देण्याची काळजी घ्यायची.. त्यानंतर ही पकडलेली ‘शिकार’ परीक्षा नळीत सोडल्यावर कापूस लावून पिंजरा बंद करायचा. बस्स.. एवढेच काम! मात्र आजूबाजूला भरपूर डास दिसत असले तरी भिंतीवरचा एखादा डास पकडण्याचा प्रयत्न केला, की कीटक संकलकांचे काम किती अवघड आहे, ते लक्षात येते. कधीही जागेवरून उडू शकणारा डास, एका हाताने नळी पकडून तोंडाने हवा खेचणे, डासावर नजर ठेवणे व दुसऱ्या हाताने नळीचे तोंड बंद करणे या सर्व क्रिया एकाच वेळी करणे निश्चितच सोपे नाही. त्यातही अडगळीच्या जागी, सांडपाण्याजवळ, उंचावरच्या कपारीपर्यंत पोहोचताना अनेकांना दुखापतही होते. सकाळपासून डासांचा शोध घेऊन दुपारनंतर हे डास पालिकेच्या प्रयोगशाळेत आणले जातात.
मुंबईत मलेरिया, डेंग्यू आणि हत्तीरोग हे आजार डासांवाटे पसरतात. या आजाराच्या रुग्णाची माहिती आरोग्य विभागाकडून आली, की त्या परिसरात जाऊन कीटक संकलकांकडून डासांचा शोध घेतला जातो. कित्येकदा अनेक मैल फिरूनही डास सापडत नाहीत. डास पकडण्यासाठी कौशल्य लागते आणि कीटक संकलक त्यासाठी प्रशिक्षित असतो.
संकलकांनी शोधून आणलेले डास आणि अळ्या यांची तपासणी केली जाते. आवश्यकता भासल्यास डासनियंत्रणासाठी औषध फवारून पुन्हा काही दिवसांनी त्या परिसरातील डासांचा शोध घेतला जातो, अशी माहिती कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली. मलेरिया व डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या तर तातडीने कारवाई होते, मात्र ‘क्युलेक्स क्विक्निफॅसिटस’ या सांडपाण्यात अंडी घालणाऱ्या डासात प्रत्येक वेळी हत्तीरोगाचा जंत असण्याची शक्यता नसते. त्यामुळे वर्षभर या डासांना पकडून, बेशुद्ध करून त्यातील जंत तपासले जातात. हत्तीरोगाचा जंत एखाद्या डासात आढळला तर त्या ठिकाणी जाऊन डासनियंत्रण केले जाते. पकडून आणलेल्या डासांवरून शहरातील डासांचे प्रकार, त्यांचे प्रमाण यांचीही माहिती मिळते जी डासनियंत्रणासाठी महत्त्वाची ठरते. पावसाळ्यात २४ वॉर्डमध्ये कीटकनाशक विभागाच्या कर्मचाऱ्यांना डासनियंत्रणाचे काम लागले आहे. कीटक नियंत्रकांकडून डासांचा शोध घेतल्यावर कोणत्या भागात अधिक काम करावे लागेल, याचाही अंदाज येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onडासMosquito
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To kill one mosquito they spend whole day
First published on: 06-07-2015 at 05:32 IST