महिला पर्यटकांची गैरसोय; पिण्याचे पाणीही नाही

मालाड पश्चिमेकडील मार्वे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्यांकरिता स्वच्छतागृह आणि शौचालयासारख्या मूलभूत सुविधांची सोय नसल्याने पर्यटकांची, विशेषत: महिलांची मोठी गैरसोय होते आहे. सुमारे दोन किलोमीटर लांब पसरलेल्या मालाड येथील या किनाऱ्यावर पश्चिम उपनगरातील तसेच ठाणे ते नवी मुंबईकडून मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. एस्सेल वर्ल्ड व वॉटर किंगडमला जाण्यासाठी अनेक देशीविदेशी पर्यटक मार्वेमार्गे जेट्टीने प्रवास करतात. पश्चिम उपनगरांतील पर्यटन स्थळ म्हणून होऊ  घातलेल्या मार्वे चौपाटीवर स्वच्छतागृह, शौचालयासारख्या मूलभूत सुविधांची मात्र वानवाच असल्याने पर्यटकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या काही वर्षांत पश्चिम उपनगरांतील मार्वे समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठय़ा संख्येने गर्दी करू लागले आहेत. शनिवार-रविवारी हा किनारा हजारो पर्यटकांनी गजबजलेला दिसतो. उन्हाळी सुट्टीत तर रोजच ही चौपाटी फुलून गेलेली दिसते.

समुद्रकिनाऱ्यावर विविध प्रकारच्या पदार्थाची चव चाखत पर्यटक मनसोक्त फिरत असतात. मात्र, पर्यटकांसाठी म्हणून आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची या चौपाटीवर वानवाच आहे.

या चौपाटीवर साधे स्वच्छतागृह व पिण्यासाठी पाण्याची सोयही उपलब्ध नाही. शौचालय नसल्यामुळे महिलांची खूपच कुचंबणा होते. मुंबईतील चौपाटय़ांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी प्रत्येक चौपाटीवर स्वच्छतागृह उभारण्याची घोषणा राज्याच्या पर्यटन विभागाने केली होती. मात्र या घोषणांचा लवलेषही या चौपटीवर दिसून येत नाही.

महिनाभरापूर्वीच मालाडच्या पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी या किनाऱ्याची पाहणी केली. यानंतर त्यांनी पर्यटकांकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या दृष्टीने अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. पर्यटकांना या सुविधा मिळाव्या यासाठी आता मेरिटाईम बोर्डाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मार्वेच्या नगरसेविका स्टेफी केणी यांनी सांगितले.

याबाबत पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

शौचालयही बंद

मार्वे चौपाटीच्या एका कोपऱ्यात एक शौचालय आहे. मात्र गेली कित्येक वर्षे ते बंद अवस्थेत असून स्वच्छतेअभावी तेथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मार्वे किनाऱ्याच्या व्यवस्थापनाकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांनी सांगितले.