कर्जापोटी घेतलेली रक्कम फेडण्यासाठी तगादा लावणाऱ्या सावकारांच्या त्रासाला कंटाळून मुलुंड येथील एका कपडय़ाच्या व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पाच दिवसांनी दोन सावकरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुलुंडच्या गणेश गावडे नगर येथील योगेश इमारतीत राहणाऱ्या भाविक दंड (३८) या कापडाच्या व्यापाऱ्याने २०१२मध्ये दोन सावकारांकडून कर्ज घेतले होते. दररोज ते या कर्जाच्या रकमेचे व्याज भरत होते. परंतु व्याजाचे १६ लाख रुपये द्यावे म्हणून या दोन्ही सावकारांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. १९ मार्च रज्जाक आणि मयूर या सावकारांनी भाविक यांना आपल्या गॅरेज मध्ये बोलावून त्यांना मारहाण केली होती. तसेच ३८ दिवसांत पैसे न दिल्यास राहत्या इमारतीत येऊन कपडे काढून मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे २० मार्च रोजी भाविक यांनी मुलुंड येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी गुजराथी भाषेत लिहिलेल्या तीन पानी चिठ्ठीत त्यांनी या सावकारांची नावे लिहून ठेवली होती. मुलुंड पोलिसांनी या दोन्ही सावकारांविरोधात मारहाण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.