सिद्धिविनायक मंदिरासमोर पाच फूट खोल खड्डय़ामुळे वाहतुकीत विघ्न
जलवाहिनीतील गळतीमुळे पोकळ झालेला प्रभादेवी येथील रस्ता गुरुवारी संध्याकाळी अचानक खचला. यामुळे सिद्धिविनायक मंदिरासमोर पाच फूट खोलीचा खड्डा तयार झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही मात्र ऐन गर्दीच्या वेळी रस्ता बंद झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. यापूर्वीही शहरातील दक्षिण भागात रस्ता खचण्याच्या घटना घडल्या आहेत.
गुरुवारी संध्याकाळी पावणेसहा वाजता सिद्धिविनायक मंदिरासमोरील रस्ता खचत असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात आले. या रस्त्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी तातडीने रस्ता मोकळा केला आणि पालिकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. रस्ता खचला तेव्हा त्यावरून बेस्टची एक बस जात होती. रस्ता खचत असल्याचे लक्षात आल्यावर चालकाने ती वेगात पुढे नेली, त्यामळे मोठी दुर्घटना टळली. मात्र पुन्हा एकदा जलवाहिनी किंवा सांडपाणी नेणाऱ्या वाहिनीतील गळतीमुळे रस्ता खचण्याची समस्या समोर आली आहे. यापूर्वीही दक्षिण मुंबईत वारंवार रस्ता खचल्याच्या घटना घडल्या आहेत.
मलबार हिल येथील जलसाठय़ातून येणारी ५७ इंचाची मुख्य जलवाहिनी प्रभादेवीमधील रस्त्याखालून जाते. या जलवाहिनीतून पाणीगळती होत असल्याने रस्ता पोकळ होऊन खचला असावा, अशी माहिती जी दक्षिण वॉर्डच्या अधिकारी डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली. खड्डय़ात पाणी साठले आहे पण त्याला दर्प येत नाही, त्यामुळे हे पाणी मलनिसारण वाहिनीचे नसल्याची खात्री पटली. आता पाणीगळती बंद करून रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

रस्ता खचल्याच्या घटना
* २१ जुलै २०१०- वरळी येथील अ‍ॅनी बेझंट रोडवर मलनिसारण वाहिनीतील गळतीमुळे रस्ता खचला होता. त्यावेळी रस्त्यावर २० फूट लांबीचा व १५ फूट खोलीचा खड्डा पडला होता.
* डिसेंबर २०१०- घाटकोपर-अंधेरी लिंकरोडवर काँक्रीटचा रस्ता खचून टेम्पोला अपघात झाला होता. त्यावेळी तेथे अचानक १०० चौरस मीटरच्या पट्टय़ातील रस्ता खचला होता.
* फेब्रुवारी २०१३- काळाचौकी येथील श्रवण यशवंते चौकात सिंमेट काँक्रीटचा सुमारे २० बाय २५ फुटांचा रस्ता खचला होता. त्यावेळी या ठिकाणी उभी असलेली बेस्ट बस क्षणापूर्वीच मार्गस्थ झाल्याने अनर्थ ठळला.
* मे २०१३- मरिन लाइन्स येथील केम्स कॉर्नर रस्त्यात पाच फूट रुंद आणि आठ फूट लांब एवढा मोठा खड्डा पडला. जमिनीखाली असलेल्या पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनि:सारण वाहिन्या जीर्ण झाल्याने रस्त्याखालील जमीन भुसभुशीत होऊन रस्ता खचला होता.
* ऑक्टोबर २०१३- प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावर श्री सिद्धिविनायक मंदिरासमोरील रस्ता अचानक खचला होता.
* मार्च २०१४- मंत्रालयाजवळील रस्त्याचा काही भाग अचानक खचला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
* एप्रिल २०१५- दहिसर नदी येथील संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू असताना अचानक २०० फूट लांब रस्ता खचला आणि तेथून जाणारी जलवाहिनी फुटली.