रस्त्यांच्या कामाचा वाहतुकीला फटका; वाहनचालक हवालदिल

पावसाळ्यानंतर मुंबईमधील लहान-मोठय़ा ३०५ रस्त्यांची एकाच वेळी सुरू करण्यात आलेली कामे, निवडणुका जवळ येताच ठिकठिकाणी मोठय़ा जलवाहिन्या टाकण्याची सुरू असलेली कामे, सेवा उपयोगिता कंपन्यांकडून रस्त्यांवर खोदण्यात येणारे चर आदी विविध कामांचा मुंबईमधील वाहतुकीवर परिणाम होऊ लागला असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत असून सकाळी आणि संध्याकाळी मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

पावसाच्या तडाख्यात खड्डय़ात गेलेल्यापैकी काही रस्ते आणि पावसाळ्यापूर्वी अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची अशी एकूण ३०५ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मुंबईतील दक्षिण भागातील बॅरिस्टर नाथ पै. मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, ग. द. आंबेकर मार्ग, रजनी पटेल चौक, सिद्धिविनायक चौक. न. चि. केळकर मार्ग, प्रबोधनकार ठाकरे मार्ग, पश्चिम उपनगरांतील स्वामी विवेकानंद मार्ग, ना. सी. फडके मार्ग, श्रद्धानंद मार्ग, वीरा देसाई मार्ग, तसेच पूर्व उपनगरांतील घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड, कोहिनूर रुग्णालय मार्ग, लल्लूभाई कम्पाऊंड मार्ग यासह मुंबईतील तब्बल ३०५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक भागांमध्ये मोठय़ा जलवाहिन्या टाकण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. या कामांच्या निमित्ताने अनेक भागांतील रस्ते खोदले असून सेवा उपयोगिता कंपन्यांच्या केबल्समुळे नव्या जलवाहिन्या टाकताना त्या वळवाव्या लागत आहेत. जलवाहिनी वळविण्याच्या कामासाठी अधिक कालावधी लागत असून अरुंद रस्त्यांना त्याचा फटका बसत आहे. या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांचे अपघात होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर जलवाहिनी टाकून खड्डा बुजविल्यानंतर शिल्लक राहणारी माती रस्त्याच्या कडेलाच पडून आहे. वाहनांमुळे ही माती रस्त्यावर पसरून दुचाकीस्वारांचे अपघात होऊ लागले आहेत. तसेच धुळीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.

  • कामे सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड लावण्याची सक्ती कंत्राटदारांवर करण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदारांनी खोदलेल्या रस्त्याभोवती बॅरिकेट उभारले असून खोदलेल्या रस्त्याची माती रस्त्याच्या कडेला पडून आहे. त्यातच मातीचे ढिगारे पडून असल्यामुळे आसपास राहणारे रहिवासी, वाहनचालक, पादचारी यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
  • सकाळी कार्यालयात जाण्याची आणि संध्याकाळी कार्यालयातून घरी परतण्याच्या वेळी मुंबईतील अनेक मुख्य रस्ते वाहतूक कोंडीमध्ये हरवून जात आहेत.
  • दक्षिण मुंबईतून उपनगरांमध्ये रस्ते मार्गाने जाणाऱ्या अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करीत तासन्तास वाहनांच्या रांगेत तिष्टत राहावे लागत आहे.