मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात वाढ झाल्यामुळे बुधवारी रस्त्यावरील वाहतुकीची चांगलीच कोंडी झालेली पहायला मिळाली. वाढीव टोलदरांबाबत मुंबईकरांमध्ये अद्याप संभ्रम असल्यामुळे ऐरोली , वाशी , मुलुंड चेकनाका, मुलुंड जकात नाका, आणि दहिसर या पाचही टोलनाक्यांवर आज सकाळपासूनच वाहनधारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
टोलच्या नवीन दरांनुसार कारचालकांना ३०ऐवजी ३५ रुपये टोलपोटी मोजावे लागतील, तर अवजड वाहनांसाठी ही वाढ १५ ते २० रुपयांची आहे. मुंबईतील प्रवास जलदगतीने होण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांच्या खर्चाची वसुली म्हणून मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि एलबीएस मार्ग या मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोलनाके उभारण्यात आले. ‘मुंबई एन्ट्री पॉइंट लि.’ या जयंत म्हैसकर यांच्या कंपनीमार्फत या पाचही ठिकाणी वाहनचालकांकडून टोलवसुली केली जाते. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात तीन वर्षांनी वाढ होते. सप्टेंबर २००२ मध्ये दर तीन वर्षांनी अशा रीतीने टोलच्या दरात वाढ होईल याबाबतची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार दर तीन वर्षांनी मुंबईच्या टोलदरात वाढ होते. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून टोलवाढ करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर वाहनधारकांनी तीव्र नाराजीदेखील व्यक्त केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
‘टोलधाडी’मुळे मुंबईत वाहतुकीची कोंडी
मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात वाढ झाल्यामुळे बुधवारी रस्त्यावरील वाहतुकीची चांगलीच कोंडी झालेली पहायला मिळाली.

First published on: 01-10-2014 at 09:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in mumbai due to increase toll rate