खासगी गाडय़ांसाठी नियमांची काटेकोर अमलबजावणी करणारे वाहतूक पोलीस अनेकदा सरकारी गाडय़ांकडे काणाडोळा करतात, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मात्र सोमवारी सकाळी शीव येथे आक्रित घडले आणि चक्क हवाई मंत्रालयाशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याच्या गाडीला वाहतूक पोलिसांनी चांगला दणका दिला. या गाडीच्या काचांना काळी फिल्म लावली असल्याने पोलिसांनी ही गाडी पकडली आणि १०० रुपये दंड व काळी फिल्म काढून गाडी आयुक्तांच्या ताब्यात दिली.
मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तपदी हवाई मंत्रालयाचे चेतन बक्षी हे अधिकारी नियुक्त आहेत. त्यांची एमएच-०१-बीए-११३२ या क्रमांकाची टाटा इंडिगो ही गाडी शीव येथे वाहतूक पोलिसांनी पकडली. या वेळी या गाडीत बक्षी स्वत: नव्हते. गाडीच्या काचांना काळी फिल्म लावलेली नसावी, असा पोलिसांचा नियम असूनही बक्षी यांच्या गाडीच्या काचा काळ्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी गाडी पकडून काचांना लावलेली काळी फिल्म काढून टाकली. तसेच गाडीच्या चालकाला १०० रुपये दंड ठोठावला.