घाटकोपर येथे झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दखल घेत स्वत:हून (सुओमोटो) जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच रेल्वे मंत्रालयासह पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठाने या घटनेची दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच रेल्वे मंत्रालय, पश्चिम व मध्य रेल्वेचे व्यवस्थापक, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाला नोटीस बजावत १३ फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान, दक्षिण मुंबईचे खासदार मिलिंद देवरा यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांना पत्रव्यवहार करीत प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची विनंती केली आहे.
अखेर रेल्वे प्रशासनाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा
गेल्या ११ जानेवारी रोजी मोनिका दुपारी महाविद्यालयातून घरी परतत असताना हा अपघात झाला आणि तिला त्यात आपले दोन्ही हात गमवावे लागले. परंतु हा अपघात तिच्याच चुकीमुळे झाल्याचा दावा रेल्वे पोलिसांकडून आतापर्यंत करण्यात येत होता. मात्र प्रसिद्धीमाध्यमांकडून रेल्वे पोलिसांच्या या कृतीचा खरपूस समाचार घेण्यात आल्यावर तसेच फलाटांची अवस्था आणि रेल्वेचा निष्काळजीपणाचा छायाचित्ररूपी पुरावा प्रसिद्ध करण्यात आल्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करता येईल का हे तपासून पाहण्याचे आदेश दिले होते.
मोनिकाला मदतीचा ओघ सुरू
दरम्यान, मोनिकाच्या उपचारासाठी मुख्यंत्री निधीतून दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले, तर मोनिका शिकत असलेल्या ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या महाविद्यालयानेही विद्यार्थी विमा योजनेअंतर्गत तिला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आता मोनिकाची लढाई कृत्रिम हातांसाठी..
या अपघाताप्रकरणी उत्तर द्यावे असे या नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाला अपघाताची सविस्तर माहिती आणि कारण स्पष्ट करावे लागणार आहे.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षांत शिकणारी मोनिका मोरे(१६) गेल्या शनिवारी दुपारी महाविद्यालयातून घरी परतण्यास निघाली असताना घाटकोपर रेल्वे स्थानकात ती गाडी पकडण्यासाठी फलाटावर आली. मात्र, त्याच वेळी गाडी सुरू झाली. गाडी पकडण्यासाठी ती फलाटावरून धावली पण गाडी पकडता न आल्याने मोनिकाचा तोल जाऊन ती रेल्वेरुळांवर पडली. गाडीचे चाक हातावरून गेल्याने तिचे दोन्ही हात कापले गेले. त्यानंतर प्रवाशांच्या आरडाओरडमुळे लोकल थांबविण्यात आली आणि तिला रुग्णालयात दाखल केले गेले होते.
मी बरी होईन ना?
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
मोनिका मोरे अपघात प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून दखल
घाटकोपर येथे झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दखल घेत स्वत:हून (सुओमोटो) जनहित याचिका दाखल करून घेतली.

First published on: 17-01-2014 at 06:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train mishap notices issued to rail ministry cr wr managers